वेतनकपातीविरोधी टोल कर्मचा-यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 05:25 PM2018-12-01T17:25:54+5:302018-12-01T17:26:16+5:30
पिंपळगाव बसवंत : प्रशासनाकडून मात्र कपातीचा इन्कार
पिंपळगाव बसवंत : येथील पीएनजी टोल नाक्यावरील कर्मचा-यांच्या वेतनात कपात केल्याच्या निषेधार्थ कर्मचा-यांनी काळ्या फिती लावून आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत कपात बंद होत नाही तोपर्यंत निषेध आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचा-यांनी केला आहे.
पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर दोन वर्षापासून मुंबईतील सहकार ग्लोबल नामक कंपनीला टोल वसुलीचा ठेका देण्यात आला आहे. या कंपनीत असंख्य कर्मचारी काम करत आहेत. गेल्या महिन्यापासून कंपनीने टोल कर्मचा-यांच्या वेतनात सुमारे अडीच ते तीन हजार रु पये इतकी कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे टोल कर्मचा-यांचे म्हणणे आहे. तर टोल प्रशासनाने कुठलीही पगारात कपात केली नसून कंपनीच्या नियमानुसार पगार वाटप सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, सर्व कर्मचारी कामावर रु जू असून वेतन कपातीबाबत दंडाला काळ्या फिती बांधून शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवित आहेत. या आंदोलनात सुधीर डांगळे, अतुल गायकवाड, अजीत गांगुर्डे, केदु शिरसाठ, बाळासाहेब पठाडे, मीनाक्षी गांगुर्डे,वैशाली गांगुर्डे,सुवर्णा बोरसे, जयश्री उशिर, भारती शेळके आदींसह टोल कर्मचारी सहभागी झाले आहेत.
भुसे यांच्यापुढे मांडल्या व्यथा
राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे हे नाशिकहून मालेगावच्या दिशेने जात असताना पिंपळगाव बसवंत येथील टोल कर्मचा-यांनी त्यांच्या गाडीला घेराव घालत कंपनीने केलेल्या वेतनकपातीची माहिती त्यांना दिली. यावेळी भुसे यांनी कर्मचा-यांची समजूत काढत कंपनीने केलेल्या कपातीची पूर्ण चौकशी करून कर्मचा-यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले.