‘प्रहार’चे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:41 AM2018-09-18T00:41:01+5:302018-09-18T00:41:29+5:30
जिल्ह्यात पावसाने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचे बळी जात असल्याने रस्त्यांवरील खड्डे बुजविले जावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पंधरा दिवसांची मुदत दिलेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले.
नाशिक : जिल्ह्यात पावसाने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचे बळी जात असल्याने रस्त्यांवरील खड्डे बुजविले जावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पंधरा दिवसांची मुदत दिलेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली. १ सप्टेंबर रोजी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. पंधरा दिवसांत खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. ‘प्रहार’चे निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी नकार दिल्याचा आरोपही यावेळी कार्यकर्त्यांनी केला. एक तास चाललेल्या या आंदोलनानंतर सरकारवाडा पोलिसांनी धाव घेत सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. या आंदोलनात अनिल भडांगे, दत्तू बोडके, किरण गोसावी, अमजद पठाण, जगन काकडे, नितीन गवळी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
घोषणाबाजी
सोमवारी दुपारी तीन वाजता ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमध्ये बसून आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्याने यासंदर्भात तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले.