राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरातून संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:51 AM2018-10-19T00:51:16+5:302018-10-19T00:51:42+5:30
विजयादशमीनिमित्त शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाशिक शहरामधील भोसला, पंचवटी, म्हसरूळ, इंदिरानगर, सिडको व नाशिकरोड देवळाली गटांच्या माध्यमातून शहरातील विविध भागांतून गुरुवारी (दि. १८)भगव्या ध्वजासोबतच सघोष व सदंड संचलन करण्यात आले.
नाशिक : विजयादशमीनिमित्त शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यानाशिक शहरामधील भोसला, पंचवटी, म्हसरूळ, इंदिरानगर, सिडको व नाशिकरोड देवळाली गटांच्या माध्यमातून शहरातील विविध भागांतून गुरुवारी (दि. १८)भगव्या ध्वजासोबतच सघोष व सदंड संचलन करण्यात आले. संपूर्ण शहरात १३४ घोष व ७५१ स्वयंसेवकांनी संचलनात सहभाग घेतला. व्ही. एन. नाईक महाविद्यालयाजवळून सायंकाळी निघालेल्या शिस्तबद्ध संचलनाने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले.
म्हसरूळ गटातून काढण्यात आलेल्या संचलनात सुमारे १६० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. यावेळी नाशिक शहर जिल्हा सहसंघचालक प्रदीप केतकर यांच्यासह सेवाप्रमुख अनिरुद्ध कंठे, मनोज पटेल, संतोष भोर आदी उपस्थित होते. दिंडोरी नाका परिसरातून सुरुवात झालेल्या संचलनचा समृद्धी कॉलनी, काकासाहेब देवधर विद्यालयामार्गे पुन्हा दिंडोरी नाका परिसरात येऊन समारोप झाला. तर पंचवटीत गटातील संचलनाला साक्षी गणपतीपासून सुरुवात झाली. हे संचलन बुधवार पेठ, दंडे हनुमान चौक, शिरीशकुमार चौक, छपरी तालीम, मधली होळीमार्गे साक्षी गणपतीजवळ पोहचल्यानंतर समारोप करण्यात आला. या संचलनासाठी प्रमुख पाहुणे शेखर औरंगाबादकर यांच्यासह संजय चंद्रात्रे, प्रशांत गर्गे, अभिजित मुकादम आदी उपस्थित होते. सिडको परिसरातून काढण्यात आलेल्या संचलनासाठी १४६ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. यावेळी नाशिक शहर संघचालक विजय कदम यांच्यासह सुबोध कुलकर्णी, महेंद्र चित्ते, गजानन देशपांडे, दीपक साबळे आदी उपस्थित होते. तर नाशिकरोड परिसरात १८० सभासदांनी संचलनात सहभाग नोंदवला. कदम लॉन्सपासून सुरू झाल्यानंतर नाशिकरोड देवळालीगाव परिसरातून हे संचलन करण्यात आले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भोसला गटाचे संचलन सुरू झाले. यावेळी राजेश जाधव व अतुल देशपांडे उपस्थित होते. व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या परिसरातून या संचलनालयाला सुरुवात झाल्यानंतर गंगापूररोड मार्गे कॉलेजरोड, विसेमळा परिसरातून पुन्हा व्ही. एन. नाईक महाविद्यालयापर्यंत पोहचल्यानंतर संचलनाचा समारोप झाला.
संचलनाने नाशिककरांचे वेधले लक्ष
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बदललेला पोषाख लांब पँट, पांढरा शर्ट, काळे बूट, पट्टा, टोपी आणि हातात असलेल्या दंडासह संचलन करणाऱ्या स्वयंसेवकांनी नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. सर्व स्वयंसेवकांनी घोष पथकाच्या तालावर संचलन करीत संघाच्या शिस्तीचे दर्शन घडवले.