आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:20 AM2019-01-23T00:20:08+5:302019-01-23T00:20:25+5:30
पेठरोड येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करणाऱ्या टाटा कंपनीच्या सेंट्रल किचन संस्थेकडून यापुढे चांगले भोजन देण्याच्या अटी-शर्तीवर विद्यार्थ्यांनी सुरू केलेले ‘अन्नत्याग’ आंदोलन मंगळवारी दुपारी मागे घेण्यात आल्याची माहिती वसतिगृह प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
पंचवटी : पेठरोड येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करणाऱ्या टाटा कंपनीच्या सेंट्रल किचन संस्थेकडून यापुढे चांगले भोजन देण्याच्या अटी-शर्तीवर विद्यार्थ्यांनी सुरू केलेले ‘अन्नत्याग’ आंदोलन मंगळवारी दुपारी मागे घेण्यात आल्याची माहिती वसतिगृह प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
एकलव्य आदिवासी निवासी शाळा व वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याचा आरोप करत सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे आदिवासी विकास विभाग तसेच वसतिगृह प्रशासनाची धावपळ उडाली होती. सोमवारी रात्री आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त लोकेश सलामे, विद्यार्थी तसेच वसतिगृह प्रशासन यांच्यात सविस्तर चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मांडलेल्या अटी भोजन पुरवणाºया संस्थेकडे मांडून वसतिगृहातच हाताने बनविलेल्या पोळ्या बनवून देणे तसेच रोज जेवणात दिल्या जाणाºया भाजीचा दर्जा सुधराविण्याच्या अटीवर मंगळवारी विद्यार्थ्यांशी पुन्हा चर्चा करण्यात आल्यानंतर दुपारी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे.
भोजन पुरवठा करणाºया संबंधित कंपनीला वारंवार लेखी तक्रार करून जेवणाचा दर्जा सुधारत नसल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करून शाळेचे प्राचार्य देवरे, गृहपाल एन. एस. चौधरी यांच्याकडे तक्रार करून आंदोलन सुरू केले होते. मंगळवारी सकाळी या विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. यापुढे वसतिगृह आवारातच हाताने पोळ्या बनवून देणार तसेच दैनंदिन जेवणात दिल्या जाणाºया भाजीत रस्सा भाजी दिली जाणार अशा अटींवर विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेत मंगळवारी दुपारी भोजन घेतल्याची माहिती वसतिगृहाचे गृहपाल चौधरी यांनी दिली.
४०० पेक्षा अधिक विद्यार्थी
पेठरोड एकलव्य निवासी शाळा व वसतिगृहात चारशेहून अधिक विद्यार्थी राहतात. इयत्ता सहावी ते १२वीपर्यंतचे ३५० विद्यार्थी शिक्षण घेतात भोजन पुरविण्याचा ठेका टाटा कंपनी सेंट्रल किचन संस्थेकडे दिला आहे. संस्थेकडून पुरवठा केले जाणारे भोजन अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी सोमवारी दिवसभर जेवण नाकारले होते.