गिरणारे-वाडगाव रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:29 AM2019-06-26T00:29:40+5:302019-06-26T00:29:56+5:30
गिरणारे ते वाडगावरोड, वाडगाव ते आळंदी डॅम, वाडगाव ते करवंडेवाडी, वाडगाव ते दाबडगाव, या रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी मंगळवारी सकाळी वाडगावकरांनी रस्त्यावर धाव घेऊन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन छेडले. रस्त्याचे काम न झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला.
गंगापूर/ मातोरी : गिरणारे ते वाडगावरोड, वाडगाव ते आळंदी डॅम, वाडगाव ते करवंडेवाडी, वाडगाव ते दाबडगाव, या रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी मंगळवारी सकाळी वाडगावकरांनी रस्त्यावर धाव घेऊन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन छेडले. रस्त्याचे काम न झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान, दिवाळीनंतर कामाची सुरुवात करण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.
गिरणारे वाडगाव रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रात्री-अपरात्री या रस्त्यावर लहान-मोठे अपघात घडत असून, नागरिक या रस्त्याला अक्षरश: वैतागले आहे. या संदर्भात वाडगावकरांनी गिरणारे ते वाडगाव रस्त्यासंदर्भात अनेक निवेदने दिली, परंतु काम होत नसल्याचे पाहून मंगळवारी सकाळी संपूर्ण गाव व परिसरातील वाड्या वस्त्यातील, नागरिकांनी वाडगाव चौफुलीवर एकत्र येत शासन व लोकप्रतिनिधींविरुद्ध घोषणाबाजी केली. तसेच आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबरोबरच ग्रामपंचायतीचा कर, महसूल कर भरण्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. सुमारे तासभर आंदोलन केल्यानंतर शिष्टमंडळाने थेट जिल्हा परिषद गाठून मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांना निवेदन सादर केले. गिरणारे गटातील व गोवर्धन गटातील जि. प. सदस्य अर्पणा खोसकर व हिरामण खोसकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत चर्चा करण्यात येऊन दोन्ही गटातील निधीतून १ कोटी १५ लाख रुपयांची तरतूद वाडगाव ते गिरणारे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी करण्याचे ठरविण्यात आले. दिवाळीनंतर या रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र जोपर्यंत रस्ता संपूर्ण सुस्थितीत होत नाही तोपर्यंत बहिष्कार अस्त्र सुरूच राहणार असल्याचे वाडगावच्या सरपंच नंदा चहाळे, ग्रामपंचायत सदस्य दत्तू लहामगे, गणपत कडाळे, उत्तम कसबे, सुभाष कसबे, काकासाहेब कसबे, एकनाथ कसबे, बाळासाहेब कसबे, विलास कसबे, वाळू कसबे, भाऊसाहेब कसबे यांनी सांगितले.
रस्त्याचे काम ५०० व ७०० मीटर होत असते, त्यामुळे एका बाजूने रस्ता झाला की दुसºया बाजूने तो खराब होतो. त्यामुळे गिरणारे ते वाडगाव हा साडेपाच मीटर रुं दीचा अखंड रस्ता पाहिजे आहे. आतापर्यंत आम्ही खूप सहन केले आता सहन करणार नाही.
- काकासाहेब कसबे, ग्रामस्थ
रस्त्याच्या कामाचे टेंडर झालेले आहे ठेकेदाराला कार्यारंभ आदेशही देण्यात
आला आहे त्याने जर २४ तासाच्या आत काम सुरू केले नाही तर त्याला काळ्या यादीत टाकण्यात येईल.
- राजेश पांडे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
वाडगाव हे गाव आजूबाजूच्या तीन-चार गावांशी जोडलेले आहे. मात्र रस्त्याअभावी सर्वांनाच अडचणी येत आहेत. त्यामुळे गावाने ठराव केला आहे की, जोपर्यंत गिरणारे-वाडगाव रस्ता डांबरीकरण होत नाही तोपर्यंत आगामी निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकणार.
- सुभाष कसबे, ग्रामस्थ, वाडगाव