नाशकात मोठ्या क्षमतेच्या ऑक्सिजन प्लांटसाठी हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:15 AM2021-05-19T04:15:49+5:302021-05-19T04:15:49+5:30
नाशिक : शहरात मोठ्या क्षमतेच्या ऑक्सिजन प्लांटसह कोविड रुग्णालयांशी निगडित वेगवेगळ्या समस्यांविषी खासदार हेमंत गोडसे यांनी आयएमएच्या नाशिक ...
नाशिक : शहरात मोठ्या क्षमतेच्या ऑक्सिजन प्लांटसह कोविड रुग्णालयांशी निगडित वेगवेगळ्या समस्यांविषी खासदार हेमंत गोडसे यांनी आयएमएच्या नाशिक कार्यालयास भेट देऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. कोविडकाळात प्रकर्षाने जाणवलेला ऑक्सिजनचा तुटवडा आणि गैरसोयी लक्षात घेता नाशिकच्या रुग्णालयांची सध्याच्या परिस्थितीसह कोविडनंतरच्या काळातही ऑक्सिजनची गरज भागवता येईल अशा क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये कसा उभारता येईल यावर या भेटीत चर्चा झाली.
खासदार हेमंत गोडसे आणि आयएमए पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नाशिकच्या रुग्णालयांच्या ऑक्सिजनसंदर्भातील सद्य:स्थितीबद्दल आयएमए अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी गोडसे यांना माहिती दिली. सर्व हॉस्पिटल्स आणि सर्वसामान्य रुग्ण सर्वांना उपयुक्त ठरू शकणारी असून त्यादृष्टीने लवकरच सर्व कोविड रुग्णालये आणि सर्व वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही करण्याची तयारीही करण्याची तयारी ‘आयएमए’तर्फे दर्शविण्यात आली. दरम्यान, कोविड-१९ च्या दुसऱ्या भयंकर लाटेदरम्यान डॉक्टरांना सामोरे जावे लागणाऱ्या इतर अनेक समस्यांचीही लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी, अशी विनंतीही या भेटी ‘आयएमए’तर्फे करण्यात आली. यावेळी ‘आयएमए’च्या सचिव डॉ. कविता गाडेकर, खजिनदार डॉ. विशाल पवार, उपाध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ आणि डॉ. उमेश नागापूरकर, ‘आयएमए’च्या नियोजित अध्यक्ष डॉ. राजश्री पाटील, तसेच कार्यकारिणी सदस्य डॉ. पंकज भदाणे, डॉ. किरण शिंदे आदी उपस्थित होते.