नदीजोड प्रकल्पाच्या सुधारित आराखड्यासाठी हालचाली गतिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 11:10 PM2020-12-22T23:10:52+5:302020-12-23T00:52:29+5:30
सिन्नर : दमणगंगा-वैतरणा-कडवा-देवनदी नदीजोड प्रस्तावित प्रकल्पाद्वारे पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी सिन्नर तालुक्याला मिळाल्यास दुष्काळाचा कलंक कायमचा पुसला जाणार आहे. त्यामुळे केंद्रीय जल आयोग व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत धोंडवार, औंढेवाडी, सोनांबे, कोनांबे शिवारात पाहणी दौरा केला. भौगोलिक रचनेचा बारकाईने अभ्यास करून प्रकल्प यशस्वी होण्यासाठी किफायतशीर मार्ग दर्शवत आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रकल्प अहवालाचा सुधारित आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
सिन्नर : दमणगंगा-वैतरणा-कडवा-देवनदी नदीजोड प्रस्तावित प्रकल्पाद्वारे पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी सिन्नर तालुक्याला मिळाल्यास दुष्काळाचा कलंक कायमचा पुसला जाणार आहे. त्यामुळे केंद्रीय जल आयोग व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत धोंडवार, औंढेवाडी, सोनांबे, कोनांबे शिवारात पाहणी दौरा केला. भौगोलिक रचनेचा बारकाईने अभ्यास करून प्रकल्प यशस्वी होण्यासाठी किफायतशीर मार्ग दर्शवत आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रकल्प अहवालाचा सुधारित आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
या प्रस्तावित प्रकल्पाद्वारे तालुक्याला सात टीएमसी पाणी मिळणार आहे. तत्कालीन राज्य सरकारने प्रकल्प रद्द करून हेच पाणी मराठवाड्याला देण्याची तयारी चालविली होती. त्याला आमदार कोकाटे यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. स्थळपाहणी दौऱ्यानंतर येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रकल्प अहवालाच्या सुधारित आराखड्याबाबत माहिती दिली.
केंद्रीय जल आयोगाचे कार्यकारी अभियंता रामा राजू, एम. एन. राव, नायर, अहमदनगरचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता नाईक, नांदूरमधमेश्वर प्रकल्प उपविभागाचे कार्यकारी अभियंता शिंपी, उपअभियंता सोनवणे, स्थानिक स्तरचे सेवानिवृत्त उपअभियंता अविनाश लोखंडे आदींचा दौऱ्यात समावेश होता.
दमणगंगा खोऱ्यातील पश्चिमवाहिनी सात टीएमसी पाणी सिन्नर तालुक्यातील सिंचन व औद्योगिक क्षेत्रासाठी (डीएमआयसी) वापरण्याचा प्रस्ताव आहे. गतकाळात खासदार हेमंत गोडसे यांनी सर्वेक्षणासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मिळवला. मात्र त्यावेळी कडवा ते सोनांबे अशी २० किमीची पाइपलाइन गृहीत धरण्यात आली होती. त्यामुळे पम्पिंगसाठी वीज व देखभाल-दुरुस्तीचा खर्च झेपला नसता. त्यातल्या त्यात जुन्या आराखड्यात तालुक्याचा काही भाग पुन्हा पाण्यापासून वंचित राहणार होता.
परिणामी प्रकल्पाची मंजुरी आणि यशस्वीता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आपण नदीजोड प्रकल्पाद्वारे पिंपळगाव घाडगाच्या मेंगाळवाडीजवळून केवळ एका टप्प्यात १२० मीटर उचलून एक ते दीड किमी बोगद्यातून पाणी धोंडबार-औंढेवाडीजवळ देवनदीत पाडण्याचा किफायतशीर मार्ग सुचवला असल्याचे आमदार कोकाटे यांनी सांगितले.
येत्या महिना-दोन महिन्यांत आराखडा तयार होईल. राज्य शासनाने स्वत:च्या पैशांतून प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प मंजूर केल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
खर्च ५ हजार कोटी; २८ हजार हेक्टरला फायदा
प्रकल्पाची किंमत सुमारे पाच हजार कोटींच्या आसपास जाऊ शकेल, असा अंदाज आहे.आता या प्रकल्पाला मंजुरी मिळवून सिन्नर तालुक्यातील २८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. तालुक्यातील ९५ टक्के गावांचा सिंचनाचा प्रश्न सुटेल. आराखडा तयार करण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता भासल्यास राज्य शासनाकडून तरतूद करून देऊ. देवनदी-शिवनदी जोडून पाणी सुळेवाडी, बारागाव पिंप्री, पाटपिंप्री, गुळवंच, कोमलवाडी, हिवरगाव, कीर्तांगळी शिवाराला देणे तसेच कोनांबे धरणातून डुबेरे, मनेगाव, पाटोळे, गोंदे, दोडी व थेट नांदूरशिंगोटे असा बंदिस्त कालवा निर्माण करण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे आमदार कोकाटे यांनी अधोरेखित केले.
दमणगंगा-वैतरणा-कडवा-देवनदी जोड प्रकल्प स्थळपाहणीप्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे, रामा राजू, एम. एन. राव, नायर, शिंपी, सोनवणे, अविनाश लोखंडे आदी. (२२ सिन्नर १)