चालत्या ‘शिवशाही’ बसने घेतला पेट; सुदैवाने प्रवाशी बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 10:29 PM2018-11-11T22:29:44+5:302018-11-11T22:33:04+5:30
नाशिक-इंदूर या मार्गावरील धुळे आगाराची शिवशाही बस (एम.एच.१८, बी.जी. २१३५) शहरातील नवीन मध्यवर्ती बसस्थानकातून रविवारी (दि.११) आठ वाजता इंदूरच्या प्रवासाला निघाली. यावेळी पाच महिलांसह एकूण १२ प्रवासी बसमध्ये होते.
नाशिक : आडगाव जकात नाक्याजवळ चालत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला. अवघ्या पाच मिनिटांत बस आगीमध्ये भस्मसात झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचा बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ पाण्याचा मारा करण्यात आला. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या बसला विझविण्यास जवानांना सुमारे पाऊण तासानंतर यश आले. सुदैवाने या घटनेतील सर्व प्रवासी सुखरूप असून, त्यांचे प्रवासाचे साहित्य मात्र जळून खाक झाले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, नाशिक-इंदूर या मार्गावरील धुळे आगाराची शिवशाही बस (एम.एच.१८, बी.जी. २१३५) शहरातील नवीन मध्यवर्ती बसस्थानकातून रविवारी (दि.११) आठ वाजता इंदूरच्या प्रवासाला निघाली. यावेळी पाच महिलांसह एकूण १२ प्रवासी बसमध्ये होते. सुमारे वीस मिनिटांचे अंतर बसने कापले. बस आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहावा मैलाच्या काही मीटर अंतरावर पोहचली असता अचानकपणे चालकाच्या कॅबिनमधील इन्व्हर्टरच्या वायरिंगमधून धूर येत असल्याचे चालक गोरख चवंदगिर यांच्यासह काही पुढे बसलेल्या प्रवाशांच्या लक्षात आले. चवंदगिर यांनी तत्काळ बस सुरक्षित मुंबई-आग्रा महामार्गावरून बाजूला उभी करत प्रवाशांना उतरण्यास सांगितले. बसला एकच दरवाजा असल्यामुळे प्रवाशांना एकापाठोपाठ उतरावे लागले. प्रवासी उतरत नाही तोच बसचा पुढील भाग आगीच्या ज्वालांच्या भक्ष्यस्थानी पडला. तत्काळ प्रवाशांसह चवंदगिर व वाहक सागर आढाव यांनी आपत्कालीन क्रमांक (१०१)वर संपर्क साधला. अग्निशामक विभागीय कार्यालय कोणार्कनगर येथून जवान बंबासह अवघ्या पाच मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत बस पूर्णपणे आगीच्या विळख्यात सापडली होती. जवानांनी त्वरित पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केली. सुमारे पाउणतास पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा जवान प्रयत्न करत होते. तासाभरानंतर आग संपूर्णपणे विझली. यावेळी केवळ शिवशाही बसचा सांगाडा शिल्लक राहिला होता.