नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 11:38 PM2020-10-27T23:38:49+5:302020-10-28T01:23:32+5:30
सुरगाणा : अजूनही बऱ्याच ठिकाणी नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. ते त्वरित करावेत.या अस्मानी संकटात शेतकरी सापडल्याने हतबल झाला असून त्याच्या ...
सुरगाणा : अजूनही बऱ्याच ठिकाणी नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. ते त्वरित करावेत.या अस्मानी संकटात शेतकरी सापडल्याने हतबल झाला असून त्याच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाल्याने तो मेटाकुटीस आला आहे कोणत्याही प्रकारच्या अटी शर्थी न ठेवता सरसकट पंचनामे करावेत.
त्यांना झालेली नुकसान भरपाई सुद्धा शासनाकडूनत्वरित मिळायला हवी. याचा पाठपुरावा मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे करणार असल्याचे खासदार डॉ.भारती पवार यांनी पाहणी दरम्यान शेतक-यांना सांगितले.
तालुक्यात अवकाळी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी भाताच्या आवणात गुडघाभर पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भाताच्या आंगरी(ओंब्या) पाण्यात भिजल्याने काही ठिकाणी आवणातच कोंब फुटले आहेत. भात भिजल्याने दाणे खराब झाल्याने तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचा निघतो.त्यामुळे भाव देखील मिळत नाही.हातातोंडाशी आलेली पिके ही ह्या अतिवृष्टीमुळे खराब झाली असून शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. यावेळी खासदार भारती पवार यांनी तालुक्यातील करवंदे, दुर्गापूर, हट्टी,शिंदे दिगर,आदी गावातील नुकसान झालेल्या शेतावर जाऊन पाहणी केली.
या प्रसंगी तालुकाध्यक्ष सुनील भोये, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रमेश थोरात, भाजपा राज्य आदिवासी आघाडी कार्यकारिणी सदस्य विठ्ठल गावित, नगरसेविका रंजना लहरे, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन महाले, नगरसेवक ज्ञानेश्वर कराटे, बाळासाहेब सुर्यवंशी, दीपक खोत, विजय देशमुख, देवाजी चव्हाण आदी उपस्थीत होते.
तालुक्यात करवंदे येथील शेतकरी बुधा देवाजी चव्हाण यांच्या भात शेतीच्या नुकसानीची पाहणी करतांना डॉ. भारती पवार, सुनिल भोये, रमेश थोरात आदीसह कार्यकर्ते.