रामाच्या जीवनाचे संदर्भ देत खासदार संजय राऊत यांनी भरला अधिवेशनात जोश
By दिनेश पाठक | Published: January 23, 2024 01:23 PM2024-01-23T13:23:43+5:302024-01-23T13:24:17+5:30
अयोध्या आंदोलनवेळी शिवसेना नसती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करता आली नसती हे देखील राऊत यांनी आवर्जून सांगितले.
नाशिक : खासदार संजय राऊत यांनी यांनी नाशिक येथे भरलेल्या शिवसेनेच्या अधिवेशनात आपल्या भाषणामध्ये श्रीराम याचे जीवनचरित्र वर्णन करून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. देशाचे वातावरण राममय असताना महाशिबिराची ज्योत प्रज्वलित झाली आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. रामाशी शिवसेनेचे भावनिक नाते आहे. सर्वात जवळचे नाते शिवसेनेचे आहे. अयोध्या आंदोलनवेळी शिवसेना नसती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करता आली नसती हे देखील राऊत यांनी आवर्जून सांगितले.
आजच्या अधिवेशनाचे ठिकाण धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र आहे. रामाने देखील अशाच जागांवर लढाया लढल्या हीच अवस्था आज शिवसेनेची असून राजकीय लढाई आम्हीच जिंकणार आहोत. रामाला सर्वात जास्त संघर्ष नाशिकमध्ये अनुभवास आला परंतु रामाचे धैर्य, शौर्य व संयम हे तीन गुण होते म्हणून राम संघर्षावर मात करून विजयी मार्गावर गेला तेच धैर्य, शौर्य, संयम हे उद्धव ठाकरे व शिवसेनेत आहे. त्यामुळे आम्ही देखील विजयी पताका फडकवणारच असे सांगून राऊत यांनी समोर बसलेली आमची वानरसेना असल्याचा उल्लेख करत उपस्थित राज्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह भरला.
सैनिक नेता म्हणून उद्धव ठाकरे यांची ओळख आहे. रामाची लढाई नितीमत्तेसाठी होती हीच लढाई सध्या उद्धव ठाकरे लढत आहे. संघर्षातून कोणताही माणूस पुढे जातो हे देखील सांगून राम अयोध्येत होता तेव्हा तो युवराज म्हणून वावरला परंतु जेव्हा तो वनवासात गेला तेव्हा तो राम झाला हे सांगताना राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना साहेब थांबा आपलेही दिवस पुन्हा येतील असा विश्वास दिला. रामाच्या काळामध्ये एकच रावण होता परंतु आता दिल्ली, मुंबईमध्ये सगळीकडे रावण निर्माण झाले आहेत, परंतु रावणाला देखील रामाकडून पराजित व्हावे लागले होते दिल्लीतील रावणाचा देखील एक दिवस पराभव होईल, असे सांगून राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केले.
कोण आले नरेंद्र मोदी, कोण आले अजित पवार. राम म्हणतात जे ईश्वराने निर्माण केले ते माझे भाग्य आहे त्यामुळे अजीत पवार, फडणवीस, शिंदे अरे थोडे थांबा काळ येईल आमचा. आम्ही तुम्हाला गाडूच. उद्धव साहेब घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहेत या सगळ्या रावणाचा पराभव आपण करूच. राम म्हणतात जे ईश्वराने निर्माण केले ते माझे भाग्य आहे. त्यामुळे घाबरू नका आपण जिंकूच असेही खासदार राऊत यांनी सांगितले.