शिवसेनेच्या विधीमंडळ कार्यलयातून उद्धव ठाकरेंचे फोटो हटवले; संजय राऊत मुख्यमंत्र्यांवर संतापले!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 07:54 PM2023-02-27T19:54:04+5:302023-02-27T19:57:09+5:30
एकनाथ शिंदेंच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी साहित्य अकादमीने दिलेल्या अहवालावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला आंतरमंत्री गट स्थापन करावयाचा होता; परंतु गेल्या एक वर्षापासून केंद्र सरकारने या गटाची स्थापनाच केलेली नाही. यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या लालफितीत अडकलेला आहे. याचदरम्यान मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाच्या भाषणात दिली.
एकनाथ शिंदेंच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने स्वाभिमानी मराठी सरकार पाडून त्यांचे मराठीवर किती प्रेम आहे, हे दाखवून दिले. या सरकारने त्यांच्या महाशक्तीला सांगावे की अभिजात भाषेचा दर्जा द्या. त्यांचे सरकार असूनही होत नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. तसेच आज शिवसेनेच्या विधीमंडळ कार्यलयातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो हटवण्यात आले. यावर देखील संजय राऊतांनी भाष्य केलं.
तुम्ही आयुष्यभर ज्यांचं मीठ खाल्लं, ज्यांनी तुम्हाला आयुष्यात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिला. अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत ज्यांनी तुम्हाला विविध पदावर नेमलं, म्हणून तुम्ही आज गद्दारीची क्रांती करू शकलात. तुम्ही त्यांचे फोटो काढता, याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. तसेच शिंदे गटाचं संबंधित कृत्य हा शूद्रपणा आहे, तो हलकटपणा आहे, असा निशाणाही संजय राऊतांनी साधला. संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदेंची ग्वाही-
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं. आज मराठी भाषा गौरव दिन देखील असल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेवून लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेईल आणि त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी विनंती करण्यात येईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.