खासदारांचे दत्तक साल्हेर गाव मोबाईलच्या रेंजमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 07:51 PM2020-12-17T19:51:49+5:302020-12-18T00:26:51+5:30
जोरण : बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी पट्ट्यातील साल्हेर या पर्यटनस्थळासह अन्य गावांमध्ये मोबाईलची रेंज नसल्याने गावकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. साल्हेर हे गाव खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दत्तक घेतलेले आहे. यासंबंधीचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करत पाठपुरावा केला होता. अखेर एका खासगी कंपनीने परिसरात मोबाईल टॉवर उभारल्याने रेंज या आदिवासी पट्ट्याच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा लाभला आहे.
साल्हेर, पायरपाडा, भिकारसोंडा, साळवण, महादर, छोटामहारदर, केळझर, तताणी, सावरपाडा, बारीपाडा, वग्रीपाडा, घुलमाल, भाटंबा आदी गावामध्ये बी.एस.एन.एल.सह अन्य कंपनीची रेंज नव्हती. बागलाण तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील छोट्या-छोट्या खेड्यांमध्ये रेंज नसल्यामुळे येथील रेशन दुकानदार व तसेच मोबाईल धारक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात लोकमतने वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर या परिसरात एका खासगी कंपनीने टॉवर उभे केले असून त्यामुळे साल्हेर परिसरातील आसपासच्या खेड्यांना रेंज मिळू लागली आहे. साल्हेर हे गाव माजी संरक्षण राज्यमंत्री व विद्ममान खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दत्तक घेतले असून हे गाव नेहमीच विकासापासून दूर राहिलेले आहे. साल्हेर हे पर्यटन स्थळ असून किल्ल्यावर विविध ठिकाणाहून पर्यटक येत असतात. याठिकाणी मोबाईलला रेंज मिळत नसल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.
बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील साल्हेर हे पर्यटनस्थळ असून येथे विविध भागातील पर्यटक येत असतात. खेड्यापाड्यांतील रेशन दुकानदार व मोबाईलधारक यांना परिसरात रेंज नसल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. वेळोवेळी संबंधित अधिकारी व तसेच लोकप्रतिनिधी यांना अनेकवेळा लेखी स्वरूपात तक्रार करण्यात आली परंतु दखल घेतली जात नव्हती. आता खासगी कंपनीने टॉवर उभारल्याने प्रश्न मिटला आहे.
- भास्कर बच्छाव, माजी सदस्य, बागलाण पंचायत समिती