जिल्हा बॅँकेत चार आमदारांसह खासदारांची ‘एन्ट्री’
By admin | Published: May 22, 2015 01:41 AM2015-05-22T01:41:16+5:302015-05-22T01:43:28+5:30
जिल्हा बॅँकेत चार आमदारांसह खासदारांची ‘एन्ट्री’
माजी आमदार पराभूत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीत चार विद्यमान आमदारांनी जिल्हा बॅँकेच्या राजकारणात प्रवेश मिळविला आहे, तर चार माजी आमदारांना पराभवाचे धनी व्हावे लागले आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वेळेपासून पराभवाचे तोंड पाहणारे भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना मात्र तिसऱ्यांदा विजयश्री प्राप्त करता आली. यातही विशेष म्हणजे या निवडणुकीत दोघा संचालक भावंडांच्या दोन दोन जोड्यांनी जिल्हा बॅँकेच्या राजकारणात प्रवेश मिळविला आहे. त्यात आमदार अपूर्व हिरे व अद्वय हिरे, तसेच नरेंद्र दराडे व किशोर दराडे यांचा समावेश आहे. तसेच नाशिक तालुक्यातून आमदार सीमा हिरे, शिवाजी चुंबळे व डॉ. शोभा बच्छाव या तीन संचालकांनी जिल्हा बॅँकेत प्रवेश केला आहे, तर येवला, मालेगाव व निफाड या तालुक्यांतून प्रत्येकी दोन संचालकांनी जिल्हा बॅँकेत प्रवेश मिळविला आहे. त्यात हिरे व दराडे बंधूंसह निफाड तालुक्यात आमदार अनिल कदम व माजी आमदार दिलीप बनकर यांचा समावेश आहे. यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादी कॉँग्रेस व भाजपाचे सर्वाधिक संचालक निवडून येऊनही ही निवडणूक पक्षीय पातळीवर लढविली न गेल्याने पहिल्यांदाच जिल्हा बॅँकेचा अध्यक्ष हा नेमका कोणत्या पक्षाचा होण्याऐवजी कोणत्या गटाचा व कोणत्या पॅनलचा होतो? याला महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळेच आता संचालकांची पळवापळवी करण्यास सुरुवात झाली तर नवल वाटायला नको.