खासदार म्हणतात, थांबा आणि पहा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 03:49 PM2020-02-29T15:49:00+5:302020-02-29T15:50:43+5:30
कांदा निर्यात बंदी : शेतकऱ्यांना सबुरीचा सल्ला
सायखेडा : कांदा निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विट केले परंतु, त्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध न झाल्याने शेतकरी वर्ग संभ्रमित असताना दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी कांदा निर्यात बंदी उठविण्यासंबंधी प्रशासकीय पूर्तता सुरु असून निर्णय झालेला आहे. त्यामुळे संभ्रमित न होता थांबा आणि पहा, असा सबुरीचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील कांद्याची निर्यात खुली केल्याची वार्ता सोशल मीडियावर व्हायरल झाली. या संदर्भात केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केलेल्या ट्विटचा हवाला दिला गेला. मात्र, तीन दिवस उलटूनही त्यासंदर्भात अधिसूचना न निघाल्याने शेतकरी, व्यापारीवर्ग संभ्रमात पडला आहे. पासवान यांनी ट्विट केले त्याच्या दुस-याच दिवशी कांद्याचे बाजार भाव चारशे रूपयांनी वाढले परंतु या संदर्भात कोणताही शासन निर्णय बाजार समितीला अद्याप प्राप्त झाला नाही अथवा तसा निर्णय शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध झाला नाही, त्यामुळे एक दिवस वाढलेले भाव पुन्हा जैसे थे झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी आणखी पेचात सापडले. या सा-या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभेच्या खासदार भारती पवार यांनी केंद्रिय मंत्री यांच्याशी कांदा निर्यातबंदी उठविण्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाली असून निर्यात संदर्भात प्रशासकीय कागद पत्रांची पूर्तता सुरु आहे. बंदी उठविण्याचा निर्णय झाला आहे आणि कांदा निर्यात खुली केली आहे. निर्यात बंदी उठविण्याची घोषणा झाली म्हणजे लगेच सारे काही सुरळीत होत नाही. त्याच्या प्रशासकीय प्रक्रियेसाठी काही अवधी दद्यावा लागतो. त्यामुळे शेतक-यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पवार यांनी केले.