येवल्याच्या पाण्यासाठी भुजबळांचे पत्र नाराजी : प्रशासन प्रस्ताव प्रलंबित ठेवत असल्याबद्दल खेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:14 AM2018-05-09T00:14:35+5:302018-05-09T00:14:35+5:30
नाशिक : येवला तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत.
नाशिक : येवला तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. त्यामुळे तहानलेल्या येवलेकरांना प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात यावे, अशा मागणीचे पत्र आमदार छगन भुजबळ यांनी मुंबईतील केईएम रुग्णालयातून नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. या पत्रात छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, जिल्हाभरात येवला तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाईची स्थिती असून, दिवसागणिक पिण्याच्या पाण्याची परिस्थिती भीषण होत आहे. हा भाग मुळातच अवर्षणप्रवण आहे. अशा परिस्थितीमध्ये गावांकडून टँकरची मागणी आल्यानंतर तातडीने पाहणी करून टँकरला मंजुरी देण्यास प्राथमिकता देणे आवश्यक असते. मात्र अनेक दिवस प्रस्ताव प्रलंबित राहत आहेत. गावांचा टंचाई कृती आराखड्यात समावेश आहे का, जलयुक्त शिवार योजनेत समावेश आहे का इत्यादी निकषांचा किस काढून काही गावांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवले जात आहेत. खरे तर टँकर मंजुरीचे अधिकार प्रांतांना देण्याऐवजी जिल्हापातळीवर घेऊन कालापव्यय केला जात असल्याने भुजबळांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. सध्या येवला तालुक्यातील संभाजीनगर-सावरगाव, बदापूर, आडगाव रेपाळ,पन्हाळसाठे व रहाडी या पाच गावांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे प्रलंबित आहेत, तर कोळम खु., कोळम बु., डोंगरगाव, खिर्डीसाठे-हनुमाननगर, पिंपळखुटे खु. अंतर्गत अहिरेवस्ती आणि कदमवस्ती अशा पाच गावांचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी स्तरावर प्रलंबित आहे. नगरसूल ग्रामपंचायतीने एकोणवीस वाड्या-वस्त्यांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे टँकर सुरू करण्यासाठी पाठविलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी कार्यालयाने अनेक दिवसांपासून मंजुरी दिलेली नाही. गणेशपूर,आड सुरेगाव, गारखेडे व देवठाण या चार गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा मंजूर आहे. मात्र ही गावे आजही पाण्याच्या टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येवल्यासाठी मंजूर असलेले १६ पैकी ५ टँकर अजूनही येवल्यात पोहोचलेले नाहीत. भीषण टंचाई परिस्थिती असतानाही ११ गावांचे प्रस्ताव अनेक दिवस विविध स्तरांवर मंजुरीसाठी प्रलंबित ठेवण्यात आल्याबद्दल भुजबळ यांनी खेद व्यक्त केला आहे. टंचाईग्रस्त गावांतील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टँकरकडे डोळे लावून बसलेले आहेत. शासकीय अधिकारी टंचाईकडे दुर्लक्ष करीत आहेत, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे. तेथील भीषण परिस्थितीचा विचार करून टंचाईग्रस्त गावांतील पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करावे आणि या गावांमध्ये टँकर पोहचले की नाही याचा आढावा घेऊन दुष्काळी भागातील नागरिकांना दिलासा द्यावा, असे भुजबळ यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.