मिस्टर परफेक्शनिस्ट आमीरचा नाशिकमध्ये फेरफटका तर माधुरीचं शुटींग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 09:00 PM2020-11-08T21:00:10+5:302020-11-08T21:00:54+5:30
गंगापूर येथील फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीच्या हेलिपॅडवर आमीर खान दाखल झाल्यानंतर अकॅडमीचे संचालक रतन लथ आणि शर्वरी लथ यांनी त्याचे स्वागत केले.
नाशिक : गुलाबी थंडीने शहारलेल्या रविवारच्या सकाळी मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमीर खानचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्याला एका चित्रपटासाठी काही स्पॉट्स शोधायचे असल्याने नाशिकच्या परिघात ५-६ तास फेरफटका मारून आमीर खान दुपारी पुन्हा हेलिकॉप्टरने रवाना झाला. लॉकडाऊननंतरच्या काळात नाशिकमध्ये शुटिंग करण्यासाठी टीव्ही मालिका निर्मात्यांबरोबरच मोठ मोठे निर्मातेदेखील प्राधान्य देऊ लागले आहेत. रविवारी (दि.8) आमीर खानदेखील अचानकपणे हेलिकॉप्टरने दाखल झाला.
गंगापूर येथील फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीच्या हेलिपॅडवर आमीर खान दाखल झाल्यानंतर अकॅडमीचे संचालक रतन लथ आणि शर्वरी लथ यांनी त्याचे स्वागत केले. नाशिकमध्ये एका चित्रपटाचे काही सीन शूट करायचे असल्याने नाशिकमध्ये काही स्पाॅट्स पाहण्यासाठी आल्याचे आमीर खान यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत ते गाडीने देवळाली कॅम्पसह महानगराच्या परिघातील काही स्थळे पाहण्यासाठी रवाना झाले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास ते पुन्हा हेलिपॅडवर येऊन हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाले.
धक-धक गर्ल माधुरी दीक्षितसुद्धा नाशकातच
नाशिकमध्ये काही दिवसांपासून माधुरी दीक्षितचे शूटींग सुरु आहे. तिथेदेखील आमीरखानने काही काळ भेट दिल्याचे समजते. तसेच आमीरखानची कार शहराच्या मध्यवर्ती भागातून रवाना झाल्याने तोदेखील चर्चेचा विषय ठरला. आमीरखान आठ ते दहा दिवस नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात शुटींग करणार असल्याचीही रविवारी चर्चा होती. दरम्यान दोन महिन्यांपूर्वीच अक्षयकुमार खासगी कामानिमित्त नाशिकला येऊन गेला होता. एकुणातच गत दीड-दाेन महिन्यांत नाशिकला बॉलिवुडच्या दिग्गज सेलेब्रिटींचे आगमनाचे प्रमाण वाढल्याने हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.