औद्योगिक प्रशिक्षणासाठी एमएसबीटीई, निमाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:33 AM2018-11-20T00:33:40+5:302018-11-20T00:34:05+5:30
पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्रात नोकरी किंवा उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व नाशिक इंडस्ट्रीज मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनने पुढाकार घेतला आहे.
नाशिक : पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्रात नोकरी किंवा उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व नाशिक इंडस्ट्रीज मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व पॉलिटेक्निक व उद्योगधंदे यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी निमाची इंडस्ट्री हब म्हणून निवड करण्यात आली असून के. के. वाघ पॉलिटेक्निकची हब इन्स्टिट्यूट म्हणून निवड करण्यात आली आहे.
निमाच्या पुढाकारातून निमा हाऊस येथे नाशिक जिल्ह्यातील सर्व तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांची महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागाचे सहायक सचिव प्रा. डी. आर. दंडगव्हाळ व किशोर मोहिते यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी दंडगव्हाळ यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी प्राप्त करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षित करण्यासाठी उपस्थितांना मार्गदशन केले, तर निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी उद्योग क्षेत्राची शिक्षण संस्थांकडून असलेली अपेक्षा व्यक्त केली. यावेळी निमाचे तुषार चव्हाण, नितीन वाघसकर, कैलास अहेर यांनी औद्योगिक क्षेत्रात आवश्यक तंत्रकुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची क्षमता शिक्षण संस्थांमध्ये आहे. त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. रवि महादेवकर यांनी ट्रेनिंगचे मॉडेल तयार करण्यासाठी प्राचार्यांना विविध सूचना केल्या. सहकारी संस्थातर्फे बीएसएनएल ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य प्रा. के. डी. गांगुर्डे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सी. एस. सोनवणे यांनीही विद्यार्थ्यांना ट्रेनिंग सुविधा देण्याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रकाश कडवे यांनी प्रास्ताविक करताना एमएसहीटीई व निमाचे उद्धिष्ट स्पष्ट केले. प्रा.राजेंद्र नारखेडे यांनी सूत्रसंचालक करून आभार मानले.