पतंगबाजी उत्सवाची महावितरणला चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:33 AM2021-01-13T04:33:58+5:302021-01-13T04:33:58+5:30
नाशिक: विद्युत तारांना किंवा खाबांना लटलेल्या पतंग काढण्याच्या नादात अनेकदा विजेचा झटका बसून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पंतगाबाजी ...
नाशिक: विद्युत तारांना किंवा खाबांना लटलेल्या पतंग काढण्याच्या नादात अनेकदा विजेचा झटका बसून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पंतगाबाजी करताना, विद्युत तारांपासून दूर राहाण्याचा सल्ला देतानाच महावितरणने फलकांच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. याबाबतच्या सूचना प्रत्यक्ष सर्कल कार्यालयांनाही देण्यात आलेल्या आहेत.
शहरी, तसेच ग्रामीण भागात वीज वितरणच्या लघू व उच्च दाब वाहिन्यांचे जाळे पसरलेले असते. अनेकदा पतंग उडविताना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकतात. अशा वेळी ते अडकलेले पतंग काठ्या, लोखंडी सळई यांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रसंगी अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होवून दुर्घटना घडते. अनेकदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात विजेचा भीषण अपघात होऊ शकतो. त्यामुळे महावितरणने जनजागृती सुरू केली आहे.
मांजा वापरण्यावर कायदेशीर बंदी असून, या मांजावर धातुमिश्रित रसायनाचे कोटिंग केलेले असल्यामुळे त्यातून वीजप्रवाह संचार करू शकतो. असा मांजा विद्युत तारेला अडकताच विद्युत यंत्रणेमध्ये विघाड होऊन संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित होऊ शकतो व त्याचबरोबर अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही, त्यामुळे कुठलाच मांजा वापरूच नये. नागरिक व लहान मुलांनी वीज वाहिन्या, वीज यंत्रणा असलेल्या परिसराएवजी सुरक्षित आणि मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा, याबाबतची जनजागृती केली जात आहे. पतंग उडविताना पालकांनी आपल्या पाल्यासोबत राहून त्याला सुरक्षिततेबातची माहिती द्यावी, तसेच लक्ष ठेवणे अपेक्षित आहे.
मकरसंक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना, उच्च व लघू दाबाच्या वीजवाहिन्या, फिडर आणि वीज यंत्रणापासून सुरक्षित अंतर व सावधगिरी बाळगावी, तसेच विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.--------