महावितरणची पावसाळापूर्व कामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:15 AM2021-05-14T04:15:12+5:302021-05-14T04:15:12+5:30
महावितरणकडून देखभाल दुरुस्तीची व्यापक कामे केली जात आहेत. विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह वाहिन्या व ...
महावितरणकडून देखभाल दुरुस्तीची व्यापक कामे केली जात आहेत. विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरुस्ती कामे केली जात आहेत. नाशिक परिमंडळात ही कामे सुरू असून जेथे कामे केली जात आहे. तेथील वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला जात आहे. ग्राहकांनी महावितरणच्या कामाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंत्यांनी केले आहे.
कोविडच्या काळातही अत्यावश्यक सेवेत असलेले महावितरणचे कर्मचारी सेवा बजावत आहेत. देखभाल दुरुस्तीचे काम करताना टप्प्याटप्प्याने कामे करून तेवढाच भाग खंडित करून त्या भागातील दुरुस्तीची कामे केली जातात. उंच वाढत असलेल्या झाडाच्या फांद्या विद्युत यंत्रणेला स्पर्श करीत असतील तर त्या फांद्या तोडणे, फुटलेले पिन आणि इन्सुलेटर बदलणे, तपासणी व दुरुस्त करणे, रोहित्रांचे ऑइल तपासणी, ऑइल गळती थांबवणे, वाहिन्यांचे खराब झालेले लायटनिंग अरेस्टर बदली करणे, भूमिगत वाहिन्यांचे तात्पुरती असलेले जॉइंट कायमस्वरूपी करणे, वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदली, जीर्ण झालेल्या वायर बदल, जळालेल्या तुटलेल्या वायर बदल, उपकेंद्रातील सर्व यांत्रिक बाबीची व यंत्रणा यांची तपासणी करणे व त्याची दुरुस्ती करणे तसेच प्रत्यक्ष वेळेवर आढळणाऱ्या त्रुटी दूर करणे, अशा प्रकारची अनेक कामे गतीने केली जात आहेत.
सदर कामे करण्याअगोदर ग्राहकांच्या मोबाइलवर एसएमएस द्वारेसुद्धा यासंदर्भात पूर्वसूचना दिली जाते आणि ही कामे योग्य प्रमाणात विभाजन करून त्याप्रकारे एक एक भाग बंद करून ही कामे केली जातात. ही कामे केल्यानंतर सुद्धा अनेकदा जोरदार वादळी वारा व पावसामुळे झाडे, फांद्या पडून तारेवरील डिक्स इन्सुलेटरवर आकाशातील वीज पडून यंत्रणेचे नुकसान होत असते. त्याबाबतचे नियोजन देखील याकाळात केले जाते.
---कोट--
सध्या लॉकडाऊन सुरू असून घरी असलेल्या नागरिकांना अखंडित वीज देण्याचा प्रयत्न आहे. मात्र, देखभाल दुरुस्तीची कामे वीज यंत्रणेच्या हिताची तसेच अखंडित, सुरळीत व सुरक्षित ग्राहक सेवेसाठी असून ग्राहकांनी या काळात थोडासा संयम राखून महावितरणला सहकार्य करावे.
दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता.