महावितरणचा ‘पडला उजेड’पहिल्याच पावसात
By admin | Published: May 9, 2016 11:57 PM2016-05-09T23:57:56+5:302016-05-10T00:34:45+5:30
दाणादाण : तब्बल दहा तास वीज यंत्रणा विस्कळीत
नाशिक : मान्सूनपूर्व पावसामुळे वीज वितरण कंपनीचे पितळ उघडे पडले असून खिळखिळीत झालेली वीज वितरण प्रणाली आणि अभियंत्यांचा निष्काळजीपणा या पावसामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. पावसामुळे तब्बल दहा तास शहरातील वीज वितरण व्यवस्था विस्कळीत झाली होती. सोमवारपर्यंत ९२ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे.
रविवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात होताच शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने खंडित झाला होता. नेमके काय झाले आणि वीजपुरवठा कधी सुरळीत होणार, याची माहिती देणारी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. जनसंपर्क अधिकारी नसल्यामुळे मुख्य अभियंत्यांसह कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंतादेखील हतबलता दर्शवित असून ग्राहकांचे समाधान करणारी माहिती अथवा उत्तरे देतानाही अधिकारी चाचपडत असल्याने या अभियंत्यांकडे नेमके अधिकार तरी काय आहेत, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील तब्बल ४० पेक्षा अधिक फिडर बंद पडले होते. तर पाच सबस्टेशनदेखील बंद पडल्याने शहराचा मोठा भाग अंधारात होता. मात्र काल याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. विस्कळीत वीज यंत्रणेचा सर्वाधिक फटका सातपूर सबस्टेशनवरील ग्राहकांना बसला. (प्रतिनिधी)