समांतर मार्ग ते भारतनगर घरकुल योजना रस्त्यावर चिखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 11:17 PM2020-06-19T23:17:28+5:302020-06-20T00:29:39+5:30
समांतर मार्गापासून ते वडाळा-पाथर्डीदरम्यान भारतनगर घरकुल योजनेकडे जाणारा रस्ता डांबरीकरणाअभावी पहिल्या पावासातच चिखलमय झाल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
इंदिरानगर : समांतर मार्गापासून ते वडाळा-पाथर्डीदरम्यान भारतनगर घरकुल योजनेकडे जाणारा रस्ता डांबरीकरणाअभावी पहिल्या पावासातच चिखलमय झाल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
दोन वर्षांपूर्वी वडाळा-पाथर्डीदरम्यान मुंबई महामार्ग समांतर रस्त्यास भारतनगर, शिवाजीवाडी मार्गे शंभर फूट रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळा ठरणारी झोपडपट्टी मनपाने हटवून रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. पुणे महामार्ग-मुंबई महामार्गाला जोडणारा हा जवळचा मार्ग असल्याने शिवाजीवाडी, भारतनगरमार्गे वाहनांची वर्दळ वाढली आहे. परिसरातील मजुरी करणाºया रहिवाशांना रोजगारासाठी अंबड, सातपूरच्या औद्योगिक वसाहतीत ये-जा करण्यासाठी हा मार्ग जवळचा असल्याने वर्दळ वाढली.
मात्र मुंबई महामार्ग समांतर रस्ता ते भारतनगर घरकुल योजनेच्या दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात सदर रस्त्यावर लहान-मोठ्या खड्ड्यांसह चिखलाचे साम्राज्य पसरते. त्यामुळे वाहन घसरून व पाय घसरून पडण्याच्या घटना घडतात. येथून मार्गक्रमण करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करावे, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.