कादवाचा साखर उतारा उत्तर महाराष्ट्रात सर्वोच्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:14 AM2021-05-19T04:14:01+5:302021-05-19T04:14:01+5:30
जिल्ह्यातील मोठमोठे कारखाने अडचणीत येत बंद पडलेले असताना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस नसतानाही कादवा जोमात सुरू असून, यंदा विक्रमी पाच ...
जिल्ह्यातील मोठमोठे कारखाने अडचणीत येत बंद पडलेले असताना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस नसतानाही कादवा जोमात सुरू असून, यंदा विक्रमी पाच लाख क्विंटल साखर निर्मिती करत उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक साखर उतारा मिळवत जास्त एफआरपी देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. जिल्ह्यातील ऊस उत्पादक कादवाला ऊस देण्यास पसंती देत असून, कार्यक्षेत्राच्या बरोबरीने जिल्ह्यातील उसाचे गाळप कादवा करत असल्याने सध्या तरी जिल्ह्यातील ऊस उत्पादकांसाठी कादवा तारणहार बनला आहे.
कादवा सहकारी साखर कारखान्यांची गाळप क्षमता १२५० मे.टन होती. ती टप्याटप्याने वाढत यावर्षी २५०० मे.टन झाली आहे. कादवाचे कार्यक्षेत्र दिंडोरी व चांदवड असून, कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस नसल्याने कादवाला नेहमीच गेटकेनच्या उसावर विसंबून राहावे लागे. गेल्या वर्षी कार्यक्षेत्रातील ४४६० हेक्टर ऊसाची तर कार्यक्षेत्राबाहेरील ४१५१ हेक्टर उसाची नोंद झाली होती. कादवाकडे कोणतेही उपपदार्थ निर्मिती नसताना कादवाची उत्तर महाराष्ट्रातील अनेक नामवंत कारखान्यांपेक्षा एफआरपी जास्त असल्याने ऊस उत्पादक कादवाला पसंती दर्शवतात. यावर्षी २६९७.३२ रुपये असून, यापूर्वी कादवाने टप्प्याटप्प्याने संपूर्ण एफआरपी अदा केली आहे. यंदा आतापर्यंत २४२५ रुपये अदा केले असून, उर्वरित लवकरच अदा करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यंदा कादवाने १७७ दिवसात विक्रमी ४ लाख ४४ हजार १५७ मे.टन ऊस गाळप करत पाच लाख पन्नास क्विंटल साखर निर्मिती केली आहे. सरासरी उतारा ११.२६ टक्के राहिला आहे. यंदाचे गळीत हंगामात सातत्याने पडणाऱ्या बेमोसमी पावसाची वारंवार बाधा आली तर हंगामाचे उत्तरार्धात मार्चमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने ऊसतोड मजूर कमी होत हंगाम लांबला. यंदा साखरेचे संपूर्ण देशात बंपर उत्पादन होत भाव नसल्याने उठाव होत नाही. त्या अडचणीत कादवाही असून, कादवाचे सर्व गोदाम साखरेने भरलेले आहे. केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालवणे शक्य नाही. त्यामुळे केंद्राने इथेनॉल प्रकल्पाकडे वळण्याचे सूतोवाच केल्यानंतर कादवाने सदर प्रकल्पाचे काम सुरू केले असून, पुढील हंगामात प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा आहे. कादवा कारखान्यास यंदा लेखा परीक्षणात अ वर्ग मिळाला असून, जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचा आधार बनलेला कादवा कारखाना सुस्थितीत सुरू आहे.
सर्वाधिक साखर उतारा असलेले कारखाने
कादवा (दिंडोरी, जि. नाशिक) ११.२६ टक्के
अगस्ती (अकोला, जि.अहमदनगर) १०.९३ टक्के
संत ज्ञानेश्वर (नेवासा, जि.अहमदनगर) १०.७६ टक्के
कर्मवीर शंकरराव काळे (कोपरगाव, जि.अहमदनगर) १०.६० टक्के
वृद्धेश्वर (पाथर्डी, जि.अहमदनगर) - १०.२० टक्के
कादवाकडे सन २० / २१ ऊस नोंद
इन्फो
कादवा कार्यक्षेत्रातील ऊस
दिंडोरी व चांदवड तालुका - ४४६० हेक्टर
कार्यक्षेत्राबाहेर - ४१५१ हेक्टर
पेठ - २८८ हेक्टर
सुरगाणा - ३५ हेक्टर
निफाड - २६७२ हेक्टर
कळवण - ७०५ हेक्टर
नाशिक - ४९५ हेक्टर
इन्फो
एफआरपी २०१९-२०
२७३६.३७ रुपये पूर्ण अदा
एफआरपी २०२०-२१
२६९७.३२ रुपये पैकी २४२५ रुपये अदा