दरोड्यातील आरोपीकडून मुुद्देमाल हस्तगत
By admin | Published: September 9, 2015 11:46 PM2015-09-09T23:46:43+5:302015-09-09T23:47:12+5:30
दरोड्यातील आरोपीकडून मुुद्देमाल हस्तगत
नाशिक : शहरातील विविध ठिकाणी दरोडा व घरफोडी करणाऱ्या दोन संशयितांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली असून, त्यांच्याकडून आठ किलो चांदीसह ४ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़
गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून संशयित शेख हसन हमजा कुट्टी (३६, रा. नवनाथनगर), गुरुदेव कृष्णाजी हेमणे (३२, रा. नांदूर नाका) या दोघांना शनिवारी (दि़५) भद्रकाली परिसरात सापळा रचून पकडण्यात आले़ तर त्यांचा सहकारी मोरे ऊर्फ रॉक्स हा फरार झाला आहे़ या दोघांनी गंगापूररोड, आडगाव येथे घरफोडी करून गॅस सिलिंडर चोरून नेले होते. तसेच काही महिन्यांपूर्वी कसबे-सुकेणे येथील सोनार व नाशिकमधील व्यापाऱ्याचे दुकान फोडून चांदी चोरून नेली होती.
या दोघांकडून पोलिसांनी प्रथम २ किलो चांदी व ८० हजार रुपये जप्त केले होते़ चोरीतील काही चांदी त्यांनी पेठरोड येथे विकल्याचे सांगितले होते. गुन्हे शाखेने या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी घरफोडी तसेच सराफी दुकानातील चोरीची माहिती दिली़ त्यांच्याकडून आतापर्यंत ८ किलो चांदी, ४ गॅस सिलिंडर, २ एलसीडी व एक दुचाकी असा एकूण ४ लाख ७४ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. (प्रतिनिधी)