याद्यांचा घोळ; केंद्र बदलाने भ्रमंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:47 AM2019-04-30T01:47:27+5:302019-04-30T01:47:50+5:30
मतदार यादीत नाव नसणे किंवा अॅपवर नाव असूनही प्रत्यक्ष यादीत अनुक्रमांक दुसराच असणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारांचे पाच-सहा किलो मीटर अंतरावर स्थलांतर यासारख्या प्रकारांमुळे उत्साह असूनही मतदारांची दमछाक झाली.
नाशिक : मतदार यादीत नाव नसणे किंवा अॅपवर नाव असूनही प्रत्यक्ष यादीत अनुक्रमांक दुसराच असणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारांचे पाच-सहा किलो मीटर अंतरावर स्थलांतर यासारख्या प्रकारांमुळे उत्साह असूनही मतदारांची दमछाक झाली. या त्रुटींचा फटका मतदानाच्या टक्केवारीला बसला अन्यथा त्यात आणखी भर पडली असती.
निवडणुकीपूर्वी मतदारांच्या नावाच्या सचित्र चिठ्या देण्याचे काम बीएलओंकडे देण्यात आले होते. परंतु त्यांनी ते काम वेळेत पूर्ण केले नाही, काही ठिकाणी अपुरे पत्ते आणि अन्य चुकांमुळे बीएलओंची इच्छा असूनही त्यांना चिठ्या पोहोचवता आल्या नाही, तर राजकीय पक्षांनीदेखील याबाबत यंदा फारसा उत्साह दाखविला नव्हता. अनेक नगरसेवकांच्या संपर्क कार्यालयात आल्यास नाव शोधून देण्याची व्यवस्था होती. मतदारांची नावे शोधण्यासाठी सोशल मीडियावर काही लिंक शेअर होत होत्या त्यावरून अनेकांनी नावे शोधली.
सोमवारी (दि. २९) सकाळी मतदान केंद्रावर गर्दी असली तरी केंद्रांच्या परिसरातच बीएलओ ठाण मांडून होते. त्याठिकाणी जाऊन मतदार नावे शोधत होती. गेल्यावेळी मतदान करूनदेखील अनेकांची नावे नव्हती. काहींकडे तर ईपीक कार्ड (मतदार ओळखपत्र) असूनही यादीत त्यांची नावे नव्हती. भाग क्रमांक, यादी क्रमांक आणि मतदान केंद्र क्रमांक अशी वेगवेगळ्या स्वरूपाच्या याद्या होत्या, त्यामुळे त्यांच्यामागे मतदारांना शोधावे लागत होते.
काठेगल्लीतील अटलबिहारी वाजपेयी शाळेच्या केंद्रात तर बीएलओंनी मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांनाच याद्या शोधण्याच्या कामांना लावले. आनंदवल्ली येथे तर बीएलओच्या टेबलासमोर मतदान केंद्रासारख्या रांगा लागल्या होत्या.