भगूरला मोकाट श्वान, वराहांचा वाढता उपद्रव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:35 AM2019-11-25T00:35:39+5:302019-11-25T00:35:56+5:30
शहरात मोकाट श्वान, वराह व घाण पाणी यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून, गावात अनेक रोग पसरले आहेत. भगूर पालिका व मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वराह पाळणारे व पालिका मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना नागरिकांच्या वतीने देण्यात आले आहे.
भगूर : शहरात मोकाट श्वान, वराह व घाण पाणी यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून, गावात अनेक रोग पसरले आहेत. भगूर पालिका व मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वराह पाळणारे व पालिका मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना नागरिकांच्या वतीने देण्यात आले आहे.
भगूर शहरात मोठ्या प्रमाणात वराहांचा सुळसुळाट होऊन ठिकठिकाणी सांडपाण्याचे डबके साचून त्यात वराह व श्वान लोळत असतात, त्यामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणी भगूर मुख्याधिकारी यांना याबाबत अनेक निवेदन दिली, तरीही ते दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक कार्यकर्ते धीरज गायकवाड, सुभाष गायकवाड, राजेश एस. गायकवाड आदींनी वराह पालन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन नाशिक जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दिले आहे. तसेच भगूर मुख्याधिकारी यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
स्वाइन फ्लू, डेंग्यूची लागण
भगूर मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार तक्र ारी करून कारवाई केली जात नाही, कामात कुचराई केली जाते त्यामुळे मोकाट वराह व श्वान यांच्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढून नागरिकांना स्वाइन फ्लू, डेंग्यू तसेच अनेक रोगांची लागण झाली आहे. शिवाय वराहपालन मोठ्या प्रमाणात होत असून, गावभर मोकाट सोडली असल्याने अनेक लहान मुलांना चावा घेत आहेत. मात्र भगूर पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदनात नमूद केले आहे.
पालिकेचे दुर्लक्ष
भगूर पोलीस चौकीसमोर व स्मशानभूमी रस्त्यालगत राहणारी काही कुटुंबे वराहपालन करीत असून, दिवसभर चरण्यासाठी शहरात वराह मोकाट सोडली जातात. कारवाई केल्यास काही दिवस घरात बांधून ठेवतात व पुन्हा सोडून देतात. यावर भगूर पालिकेच्या वतीने काहीच कारवाई न करता त्यांच्या दादागिरीला घाबरत असल्याचे अनेक नागरिकांनी संतापात सांगितले.