मुहम्मद रफी यांना सरकारने द्यावा ‘भारतरत्न’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:18 IST2018-12-24T00:18:18+5:302018-12-24T00:18:57+5:30
हिंदी, उर्दू, मराठी, इंग्रजी, तेलगू, पंजाबी, गुजराथी, बंगाली अशा विविध भाषांमधून हजारो गीतांना स्वरबद्ध करणारे पद्मश्री मुहम्मद रफी या दिग्गज गायकाचा भारत सरकारने मरणोपरान्त ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान करावा, अशी इच्छा टकलेनगर परिसरात राहणाऱ्या त्यांच्या ६५ वर्षीय चंद्रकांत दुसाने या चाहत्याने केली आहे.

मुहम्मद रफी यांना सरकारने द्यावा ‘भारतरत्न’
मुहम्मद रफी जयंती विशेष
नाशिक : हिंदी, उर्दू, मराठी, इंग्रजी, तेलगू, पंजाबी, गुजराथी, बंगाली अशा विविध भाषांमधून हजारो गीतांना स्वरबद्ध करणारे पद्मश्री मुहम्मद रफी या दिग्गज गायकाचा भारत सरकारने मरणोपरान्त ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान करावा, अशी इच्छा टकलेनगर परिसरात राहणाऱ्या त्यांच्या ६५ वर्षीय चंद्रकांत दुसाने या चाहत्याने केली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचे प्रख्यात पार्श्वगायक मुहम्मद रफी यांचा जन्म पंजाब राज्यातील कोटला जवळ सुलतनसिंह येथे २४ डिसेंबर १९२४ साली झाला. सोमवारी (दि.२४) त्यांची ९४वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्त पूर्वसंध्येला शहरातील रफी यांचे अस्सल व कट्टर चाहते चंद्रकांत दुसाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना रफी साहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला.
बालपणापासून रफींच्या गीतांची भुरळ पडलेल्या दुसाने यांनी आपले उभे आयुष्य त्यांच्या गीतांवर प्रेम करण्यात व्यतीत केले. त्यांनी रफींच्या आवाजातील सुमारे वीस हजार गीतांचा संग्रह करून रेकॉर्डप्लेअर, कॅसेट, सीडीच्या माध्यमातून करून ठेवला आहे. हा संग्रहच मला उतारवयात तारुण्याची ऊर्जा बहाल करत असल्याचे दुसाने यांनी आवर्जून सांगितले. सरकारकडून रफींना भारतरत्न जाहीर करण्यात आल्याची वार्ता जेव्हा माझ्या कानी पडेल तेव्हा माझ्या प्रेमाचे खरे सार्थक होईल, असे दुसाने म्हणाले.
आई देत होती रफींची ‘कसम’
दुसाने यांनी एखादी गोष्ट करावी किंवा करू नये यासाठी त्यांना त्यांच्या मातोश्री बालपणापासून महाविद्यालयीन जीवनापर्यंत थेट रफीजींची ‘कसम’ देत असे, अशी आठवणही त्यांनी सांगितली. जुन्या काळात तांग्यातून नव्या चित्रपटाची उद्घोषणा केली जात होती. त्यावेळी ज्या चित्रपटांमध्ये रफींची गीते आहेत ती उद्घोषणेदरम्यान कानी पडली की दुसाने त्या तांग्यामागे फिरत असे.
वास्तुशांतीला रफींच्या गीतांची मेजवानी
दुसाने यांनी जेव्हा नवीन घर घेतले तेव्हा त्यांनी कुठल्याही प्रकारची पूजाविधी करण्याअगोदर वास्तुशांती चक्क रफींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली. तसेच संपूर्ण दिवसभर मित्र परिवारासह रफीजींवर प्रेम करणाºयांना बोलावून त्यांची गाणी ऐकविली होती. दुसाने यांनी ३५ वर्षे कंपनीत कामगार म्हणून नोकरी करतानाही रफींच्या गीतांचा छंद तितकाच निष्ठेने जोपासला. ‘ओन्ली रफीं’चे त्यांच्याकडे एक हजार रेकॉर्ड, आठशे कॅसेट, ३५० सीडींचा संग्रह आहे.