क्रीडा धोरणाला लागेना मुहूर्त
By admin | Published: October 9, 2014 01:00 AM2014-10-09T01:00:05+5:302014-10-09T01:22:38+5:30
क्रीडा धोरणाला लागेना मुहूर्त
नाशिक : क्रीडा धोरण तयार करणारी राज्यातील पहिली महापालिका म्हणून गाजावाजा करण्यात आला खरा; परंतु या धोरणाच्या अंमलबजावणीला अद्याप मुहूर्तच लागलेला नाही. तीन महिने उलटल्यानंतर आत्ताशी प्रशासनाला महापौर कार्यालयाकडून ठराव प्राप्त झाला असून, आता त्यावर दिवाळीनंतरच कार्यवाही होण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेचे स्वतंत्र क्रीडा धोरण राबविण्यासाठी गेल्या वर्षी तत्कालीन महापौर अॅड. यतिन वाघ यांनी तयारी केली. त्यासंदर्भात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात क्रीडा संघटना प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात प्रस्ताव तयार होऊन महासभेवर सादर होण्यास जुलै महिना उजाडला. चालू वर्षी जुलै महिन्यात हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला; परंतु तो महापौर कार्यालयाकडून नगरसचिव विभागाकडे पाठविण्यात आला नव्हता. त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्नच नव्हता. अखेरीस गेल्या आठवड्यात म्हणजे दोन ते तीन दिवसांपूर्वी महापौर कार्यालयाकडून हा क्रीडा धोरणासंदर्भात दुरुस्तीसह मंजूर झालेला ठराव नगरसचिव विभागाला प्राप्त झाला.
या विभागाने तो समन्वय कक्षाकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर तो संबंधित विभागाकडे पाठविला जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी आधी आचारसंहिता व त्यानंतर दिवाळी तर पार करावी लागणार आहेच; परंतु पूर्णवेळ आयुक्त आल्यानंतरच म्हणजेच राज्यातील निवडणुकीनंतर त्याच्या अंमलबजावणीला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)