नाशिक उपकेंद्राला दोन महिन्यांत मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:56 IST2020-01-12T23:44:53+5:302020-01-13T00:56:45+5:30
गेल्या सात ते आठ वर्षांपासून रखडलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राच्या बांधकामाला लवकरच मुहूर्त लाभणार असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत नाशिक उपकें द्राचे भूमिपूजन करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (दि. ११) विद्यापीठातील बैठकीत केल्याची माहिती सिनेटचे स्वीकृत सदस्य अमित पाटील यांनी दिली आहे.

नाशिक उपकेंद्राला दोन महिन्यांत मुहूर्त
नाशिक : गेल्या सात ते आठ वर्षांपासून रखडलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठनाशिक उपकेंद्राच्या बांधकामाला लवकरच मुहूर्त लाभणार असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत नाशिक उपकें द्राचे भूमिपूजन करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (दि. ११) विद्यापीठातील बैठकीत केल्याची माहिती सिनेटचे स्वीकृत सदस्य अमित पाटील यांनी दिली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठाच्या विविध समसस्यांसह नाशिक व अहमदनगर येथील उपकेंद्रांविषयी आढावा घेतला. यावेळी उदय सामंत यांनी नाशिक उपकेंद्राविषयी सकारात्मक भूमिका घेत येत्या दोन ते तीन महिन्यांत उपकेंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्याचे आश्वासन उपस्थित सिनेट सदस्य व पदाधिकाऱ्यांना दिले. पुणे विद्यापीठाच्या नाशिक आणि नगर उपकेंद्र्रांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सिनेट सदस्य अमित पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या होत्या. त्यानंतर शनिवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष विद्यापीठात बैठक घेत विद्यापीठ प्रशासनासोबत चर्चा केली. तसेच उपकें द्रांच्या कामातील अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपकेंद्रांच्या कामाला गती देण्यासाठी शासन आदेश काढण्याची गरज कुलगुरू नितीन करमाळकर यांनी यावेळी व्यक्त करताच येत्या पंधरा दिवसांत यासंदर्भातील शासन आदेश काढून दोन महिन्यात बांधकामाचे भूमिपूजन करण्याचे सामंत यांनी जाहीर केले. यावेळी प्र-कुलगुरू उमराणी, कुलसचिव प्रफुल्ल पवार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक माने, सिनेट सदस्य अमित पाटील आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
उपकेंद्राची प्रतीक्षा संपणार
नाशिकमध्ये स्वतंत्र विद्यापीठ उपकेंद्र कॅम्पस उभारण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे ६२.५ एकर जागा शासनाकडून देण्यात आलेली आहे. परंतु, सुरुवातीला स्थानिक नागरिकांचा विरोध, त्यानंतर त्या जागेवरील अतिक्रमणाचा प्रश्न यामुळे उपकेंद्राच्या कामास अजूनही सुरुवात होऊ शकलेली नाही. २०१८ मध्ये विद्यापीठ कॅम्पसचे काम पूर्ण झालेले असेल, असे सांगण्यात आले होते. परंतु २०१३-१४ पासून असलेली प्रतीक्षा आजही कायम आहे. परंतु, यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दोन महिन्यात भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची घोषणा केल्याने नाशिक उपकेंद्राच्या कामाला आता लवकरच मुहूर्त मिळणार असल्याचे दिसून येत आहे.