मालेगाव शहरातून मूक मोर्चा, सामुदायिक अजान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:47 AM2018-12-07T00:47:29+5:302018-12-07T00:53:37+5:30
मालेगावमध्य : बाबरी मशीदच्या पतनदिनानिमित्ताने बाबरी मशीद बचाव कमिटीच्या वतीने माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर शहिदोंकी यादगार येथे सामुदायिक अजान देण्यात आली. यावेळी मागण्यांचे निवेदन प्रांत अजय मोरे यांनी स्वीकारले.
मालेगावमध्य : बाबरी मशीदच्या पतनदिनानिमित्ताने बाबरी मशीद बचाव कमिटीच्या वतीने माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर शहिदोंकी यादगार येथे सामुदायिक अजान देण्यात आली. यावेळी मागण्यांचे निवेदन प्रांत अजय मोरे यांनी स्वीकारले.
६ डिसेंबर १९९२ साली अयोध्येतील बाबरी मशिदीचे पतन झाले होते. या घटनेस २६ वर्षे झाल्याने शहरातील बाबरी मशीद बचाव कमिटीच्या वतीने गुरुवारी मुशावरत चौकातून मूक मोर्चा काढण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ तरुणांनी काळ्याफिती बांधून, हातात काळे झेंडे घेत तर काहींनी काळे कपडे परिधान करून मोर्चात सहभाग घेतला. रॅली मोहंमद अली रस्ता, पेरी चौक, किदवाई रोड मार्गे शहिदोंकी यादगार येथे पोहोचला. यावेळी पोलिसांनी मोर्चा अडविला. येथे त्याचे सभेत रूपांतर झाले.
मुफ्ती मोहंमद इस्माईल म्हणाले की, बाबरी मशीद हा धार्मिक प्रश्न आहे. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास असून निर्णय आम्हास मान्य राहील. आमच्या भावना कळविण्यासाठी शांततेच्या मार्गाने मूक रॅलीचे आयोजन करीत सरकारकडे निषेध नोंदवित आहोत. सरकारने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. यानंतर मागण्यांचे निवेदन प्रांत अजय मोरे यांना सादर करण्यात आले.
यावेळी मुस्तकीम डिग्निटी, हाजी युसूफ इलियास, नगरसेवक एजाज बेग, अतिक कमाल यांच्यासह समाजबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. बाबरी मशीद बचाव कमिटीचे अध्यक्ष बुलंद एकबाल यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते मुंबई येथे आहेत. त्यामुळे त्यांनी भ्रमणध्वनीवरूनच सभेस मार्गदर्शन केले. बुलंद एकबाल म्हणाले की, दिवंगत नेते निहाल अहमद यांनी बाबरी मशीद बचाव समितीची स्थापना करून वेळोवेळी आंदोलने केली होती. हीच परंपरा पुढे चालवित रॅलीचे आयोजन करून सरकारचे याप्रश्नी लक्ष वेधण्यात येत आहे.