मुंबई नाका : दोनवेळा कारवाईनंतर उड्डाणपुलाखाली पुन्हा बकाल स्वरूप प्राप्त विक्रेत्यांचे अतिक्रमण ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:35 AM2017-12-20T01:35:20+5:302017-12-20T01:35:56+5:30
मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखाली गजरा विक्रेत्यांसह भिकारी, भटके यांचे अतिक्रमण कायम आहे. दोनवेळा अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवूनदेखील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
इंदिरानगर : मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखाली गजरा विक्रेत्यांसह भिकारी, भटके यांचे अतिक्रमण कायम आहे. दोनवेळा अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवूनदेखील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. या भागाला बकाल स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
गजरा विक्रेत्यांचा अनधिकृत डेरा उठणार का कायमस्वरूपी असेच बकाल स्वरूप प्राप्त राहणार आहे? असा उपरोधिक प्रश्नही संतप्त नागरिकांनी केला आहे. मुंबई नाका चौफुलीवर महामार्ग बसस्थानका द्वारका सर्कल, भाभानगर आणि पाथर्डी फाट्याकडून असे चार रस्ते येतात, त्यामुळे चौफुलीवर दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. उड्डाणपुलाखाली गजरे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. गजरे विकून हे उदरनिर्वाह करत असले तरी त्यांनी पुलाखालीच डेरा टाकला आहे, तेथेच आंघोळ, स्वयंपाक, झोप मलमूत्र विजर्सन आदी गोष्टी होत असल्याने पुलाखाली बकालपणा वाढला आहे. मुंबईनाका येथे आकर्षक असे वाहतूक बेट करण्यात आल्याने सौंदर्यात भर पडली आहे, तर दुसरीकडे गजरे विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे शहराचे सौंदर्य बिघडत आहे. महापालिकेच्या वतीने दोन वेळेस अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने कारवाई करून सुद्धा त्यांची पाठ फिरताच परिस्थिती ‘जैसे थे’च होत आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघातही दररोज घडत असून, जीवितहानी वाट बघत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.