मुंबई नाका परिसराला बकाल स्वरूप प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:02 PM2018-12-29T23:02:41+5:302018-12-30T00:24:31+5:30
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने दोन वेळा कारवाई करूनसुद्धा मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखाली गजरा विक्रेत्यांचे अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
इंदिरानगर : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने दोन वेळा कारवाई करूनसुद्धा मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखाली गजरा विक्रेत्यांचे अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गजरा विक्रेत्यांचा अनधिकृत डेरा केव्हा उठणार? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. मुंबई नाका चौफुलीवर महामार्ग बसस्थानक, द्वारका सर्कल, भाभानगर आणि पाथर्डी फाट्याकडून असे रस्ते एकत्र येतात. त्यामुळे चौफुलीवर दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. उड्डाणपुलाखाली गजरे विक्रे त्यांनी अतिक्र मण केले आहे. गजरे विकून हे उदरनिर्वाह करत असले तरी त्यांनी पुलाखालीच डेरा टाकला आहे. त्यांच्या तेथेच आंघोळ, स्वयंपाक, झोप आदी गोष्टी होत असल्याने पुलाखाली बकालपणा वाढला आहे. मुंबई नाका येथे आकर्षक असे वाहतूक बेट करण्यात आल्याने सौंदर्यात भर पडली आहे, तर दुसरीकडे गजरे विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे शहराचे सौंदर्य बिघडत आहे. महापालिकेच्या वतीने दोन वेळेस अतिक्र मण निर्मूलन मोहिमेने कारवाई करून सुद्धा त्यांची पाठ फिरताच परिस्थिती ‘जैसे थे’च होत आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघातही दररोज घडत असून जीवितहानीची वाट बघत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. कायमस्वरूपी असेच बकाल स्वरूप प्राप्त राहणार आहे? का असा उपरोधिक प्रश्नही संतप्त नागरिकांनी केला आहे.
दुर्घटनेची शक्यता
गजरे विक्रेत्यांची लहान मुले महामार्गावरून पळत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यताही टाळता येत नाही. तसेच लहान मुले दुचाकी आणि चारचाकीच्या पाठीमागे पळत असल्याने अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही.