नव्या जागेत मुंबई नाका पोलीस ठाणे
By admin | Published: December 29, 2015 11:31 PM2015-12-29T23:31:17+5:302015-12-29T23:31:46+5:30
नव्या वर्षाचा मुहूर्त : रंगरंगोटीसह तयारी पूर्ण
इंदिरानगर : पोलीस ठाण्यांवरील वाढता ताण लक्षात घेऊन करण्यात आलेल्या विभाजनात मुंबई नाका हे नवे पोलीस ठाणे यापूर्वीच मंजूर असून, येत्या १ जानेवारीपासून ते कार्यान्वित करण्यात येणार आहे.
शहरात दिवसागणिक वाढत्या गृहनिर्माण संस्था, तसेच सोसायट्या यामुळे नागरी वस्ती वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस ठाण्यांवरही कामाचा ताण वाढत आहे. साहजिकच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रतिबंधात्मक कारवाई करणे वा एखाद्या घटनेच्या वेळी तातडीने दाखल होणे यासाठी मर्यादित पोलीस बळात अडचण होत होती. याचाच विचार करून मुंबई आणि म्हसरूळ अशी दोन पोलीस ठाणी मंजूर करण्यात आली आहेत.
गेल्या तीन महिन्यांपूर्वी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे काम मुंबई नाका येथील जुन्या शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयातून केले जात होते. मात्र, आता वाढीव बांधकाम आणि स्वतंत्र रचना येथे करण्यात आली आहे. रंगरंगोटीही झाली आहे. त्यामुळे येत्या एक तारखेपासून नवीन आणि प्रशस्त जागेतून मुंबई नाका पोलीस ठाण्याचा कारभार सुरू होणार आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना रीतसर आदेश प्राप्त झाला आहे.
नव्या पोलीस ठाण्यात जुन्या चार पोलीस ठाण्यांच्या भौगोलिक हद्दीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई नाका पोलीस ठाण्यात अनेक अन्य पोलीस ठाण्यातील कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत. त्यांना हद्दीची भौगोलिक माहिती आहे, अशा पोलीस कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.