मुंबई नाका : पोलिस ठाण्याच्या वाहनांचा रहदारीला अडथला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 04:58 PM2020-02-27T16:58:20+5:302020-02-27T16:59:45+5:30
मुंबईनाका चौक म्हटला की वाहतुकीचा प्रचंड तान या भागात पहावयास मिळतो. रुग्णालये, बसस्थानक , टॅक्सी, रिक्षा थांबे, महामार्ग, अंतर्गत रस्ते अशा सर्वच बाबींमुळे मुंबईनाका चौकात वाहतूक...
नाशिक : एकीकडे शहरातील महत्त्वाचे रहदारीचे रस्ते, चौकांमधील वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी आयुक्तालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. वाहतुकीचे नियोजन वेगवेगळ्या पद्धतीने पोलीस आयुक्त लक्ष घालून करताना दिसून येत असताना दुसरीकडे मात्र मुंबईनाक्यावर मात्र वाहतुकीला पोलिसांकडूनच अडथळा निर्माण केला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे अत्यंत वर्दळीच्या चौकात हा ‘अडथळा’ का खपवून घेतला जात आहे? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
मुंबईनाका चौक म्हटला की वाहतुकीचा प्रचंड तान या भागात पहावयास मिळतो. रुग्णालये, बसस्थानक , टॅक्सी, रिक्षा थांबे, महामार्ग, अंतर्गत रस्ते अशा सर्वच बाबींमुळे मुंबईनाका चौकात वाहतूक मोठ्या प्रमाणात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पहावयास मिळते. मुंबईनाका पोलीस ठाण्याला हक्काची स्वतंत्र जागा हवी यात दुमत नाही; मात्र ज्या जागेत पोलीस ठाणे आहे, ती जागाही खूप काही लहान आहे, असे नाही. चोरीची वाहने, अपघातग्रस्त वाहनांचे वाढते ‘भंगार’मुळे मुंबईनाका पोलिसांना जागेची चणचण भासू लागली आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्याबाहेर मदिना चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक बेटाजवळच दुचाकींचे अनधिकृत पार्किंग आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्याचे गस्तीवरील वाहनेही याच भागात उभ्या केल्या जातात. एवढेच नव्हे, तर चक्क अपघातग्रस्त रिक्षाचा सांगाडाही मागील अनेक दिवसांपासून भर रस्त्यात वाहतूक बेटाभोवती ठेवण्यात आला आहे. त्यापुढे एका मोटारही धूळखात पडून आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, अपघाताला निमंत्रण मिळण्याची भीती व्यक्त होत आहे.