कार-ट्रक अपघातात मुंब्य्राचे पोलीस निरीक्षक खांडवी मृत्यूमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:16 AM2021-03-16T04:16:04+5:302021-03-16T04:16:04+5:30
याबाबत अधिक माहिती अशी, मुंब्रा पोलीस ठाण्यात नोकरीस असलेले व मूळचे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा येथील रहिवासी असलेले ...
याबाबत अधिक माहिती अशी, मुंब्रा पोलीस ठाण्यात नोकरीस असलेले व मूळचे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा येथील रहिवासी असलेले पांडुरंग खांडवी हे वणी येथील एका नातेवाईकाच्या कौटुंबिक कार्यक्रमाला हजेरी लावून मुंब्राच्यादिशेने खासगी कारने (एम.एच ०२ डी.डब्ल्यू. ७०६६) कुटुंबीयांसह प्रवास करत होते. दरम्यान, वाडीवऱ्हेजवळील रायगडनगर येथे महामार्गाच्या नाशिक-मुंबई लेनवर रविवारी (दि.१४) रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांच्या कारला महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकच्या (एमपी ०९ एचएच ३७१७) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कट मारल्याने कारचालकाचे नियंत्रण सुटून कार ट्रकला धडकल्याचे वाडीवऱ्हे पोलिसांनी सांगितले. यावेळी कारमध्ये चालकासह एकूण पाच ते सहा प्रवासी होते. यावेळी घटनेची माहिती मिळताच घोटी महामार्ग पोलिसांसह वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जगदगुरु स्वामी नरेंद्राचार्य संस्थानच्या गोंदेफाटा येथील रुग्णवाहिकेने सर्व जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. पांडुरंग खांडवी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. अपघातात मीना पांडुरंग खाडवी (४०), वैष्णवी पांडुरंग खांडवी (१५), जय पांडुरंग खांडवी (१२, सर्व. रा. कादरी मेन्शन, क्वाॅर्टर, माहीम पोलीस वसाहत, मुंबई) आणि कारचालक विनायक रघुनाथ सानप (२०, रा. मुंब्रा) हे जखमी झाले आहेत. दैव बलवत्तर असल्याने या चौघांचे प्राण वाचले.
----इन्फो--
मुंब्रा पोलीस दलात शोककळा
मुंब्रा पोलीस ठाण्यातील प्रशासन विभाागात पोलीस निरीक्षक म्हणून खांडवी मागील चार ते पाच वर्षांपासून कर्तव्यावर होते. ते मूळचे सुरगाणा येथील रहिवासी असून त्यांनी राज्यातील विविध शहरांमध्ये सेवा बजावली आहे. त्यांच्या अपघाती निधनाने मुंब्रा पोलीस दलात शोककळा पसरली असून उपायुक्त ए.एम. अंबुरे, सहायक आयुक्त सुनील घोसाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मुंब्रा पोलीस दल खांडवी यांच्या कुटुंबीयांसोबत असून कड यांनी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करत जखमींवर सर्वोतोपरी अत्यावश्यक उपचार तातडीने करण्याची सूचना केली आहे.
-----
फोटो आर वर १५कार ॲक्सिडेंट नावाने. तसेच १५खांडवी नावाने आर वर मृताचा फोटो सेव्ह आहे.