मुंबईच्या ड्यूटीने जिवाला घोर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:15 AM2021-04-01T04:15:54+5:302021-04-01T04:15:54+5:30
एस.टी चालक-वाहकांचा नकार कोरोनाची भीती : गैरसोय होत असल्याने तब्येतीवर परिणाम नाशिक : मुंबईतील बेस्ट बसेसेवेला मदत करण्यासाठी करण्यात ...
एस.टी चालक-वाहकांचा नकार
कोरोनाची भीती : गैरसोय होत असल्याने तब्येतीवर परिणाम
नाशिक : मुंबईतील बेस्ट बसेसेवेला मदत करण्यासाठी करण्यात आलेल्या करारानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आणि कर्मचाऱ्यांना मुंबईत जाऊन ड्यूटी करावी लागत आहे. मात्र, तेथील गैरसोयीमुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाल्याने चालक-वाहकांना मुंबईची ड्यूटी नकोशी वाटत आहे.
कोरोनाच्या संक्रमणामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने उत्पन्नाचे अनेक मार्ग शोधून काढले. थोड्या प्रमाणात का होईना महामंडळाचे अर्थचक्र सुरू राहावे यासाठी अनेक उपायोजना करणाऱ्या महामंडळाने बेस्टच्या मदतीच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत मुंबईत कर्मचाऱ्यांसह बसेस चालविण्यास अनुमती दिली आहे. त्यामुळे दर महिन्याला नाशिक जिल्ह्यातून बेस्टच्या मदतीला कर्मचारी आणि बसेस पाठविल्या जात आहेत.
या ठिकाणी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय हाॅटेल्स, लॉजमध्ये करण्यात आलेली आहे. जेवणासाठीची देखील वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे; परंतु मुंबईत सेवा बजाविताना महामंडळाच्या अनेक कर्मचाऱ्यांना तेथील जेवणामुळे त्रास सहन करावा लागत आहे, तर राहण्याची सोय देखील सांगितली जाते त्याप्रमाणे होत नसल्याने चालक, वाहक मुंबईत जाण्यास तयार नाहीत. येथील जेवणामुळे अनेकांना त्रास झाल्यामुळे प्रकृतीवर परिणाम झालेला आहे.
राहण्याची गलिच्छ व्यवस्था, निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या तक्रारी अनेक कर्मचाऱ्यांनी पुराव्यासह केलेल्या आहेत. मात्र, त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कर्मचारी मुंबईत जाण्यास तयार नाहीत.
---इन्फो---
गेल्या वर्षी आपल्या जिल्ह्यातून किती जणांना मुंबईला पाठविले.
३८०
चालक
१८०
वाहक
१८०
परत आल्यानंतर किती जण पॉझिटिव्ह निघाले
०७
यावर्षी १३० जणांना पाठविले जाणार आहे.
--इन्फो--
परत आल्यानंतर अनेकांना झाला त्रास
मुंबईतील डयूटीवरून परत आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. विशेषत: पोटदुखीच्या तक्रारी अनेक चालक, वाहकांनी केल्या. काहींना शारीरिक थकवा जाणवला, तर काहींना पित्ताचा देखील त्रास झाला. ड्यूटीवरून आलेल्या कर्मचाऱ्यांना काही त्रास होत असेल तर त्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असा फतवा महामंडळाने काढला. यामध्ये महामंडळाने कोणताही सहभाग घेतला नाही.
----इन्फो--
चालक, वाहकांच्या प्रतिक्रिया
मुंबईतील ड्यूटी करताना अनेक अडचणी आल्या. एकतर राहण्याची व्यवस्था चांगली नव्हतीच, शिवाय जेवणाची गैरसोय झाली. बेस्टच्या सेवेसाठी महामंडळ आपल्या बसेस आणि कर्मचारी देत असताना बेस्टकडून नियोजन होणे अपेक्षित होते; परंतु एस. टी. कर्मचाऱ्यांकडे लक्षच दिले जात नाही.
- चंद्रकांत देवगाकर, वाहक
सलग दहा दिवस ड्यूटी करावी लागत असल्याने मुंबईत काम करताना मोठा ताण येतो. त्यातही उन्हाळ्यात काम करण्याची सक्ती केली जात असल्याने महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांचा विचार करावा ही अपेक्षा आहे. सेवा कालावधी कमी करणे अपेक्षित आहे.
- आप्पाराव जोपुळे, चालक
--इन्फो--
राज्य पातळीवरच बेस्टबरोबर करार करण्यात आल्याने संपूर्ण राज्यातून प्रत्येक डेपोनिहाय कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावली जाते. केवळ चालक, वाहकच नव्हे, तर तांत्रिक कर्मचाऱ्यांना देखील ड्यूटी दिली जाते. डेपो पातळीवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते.