मुंबईच्या तोतया आयपीएस अधिकाऱ्याने नाशिकमध्ये व्यावसायिकांना घातला लाखोंचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 05:31 PM2018-03-29T17:31:09+5:302018-03-29T17:31:09+5:30
नाशिकला ‘मुन्नाभाई आयपीएस’ याने पुन्हा शरणपूररोड परिसरातील एक तारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य केले. दरम्यान, जगप्रसाद यांनी त्याच्यासोबत असलेल्या सय्यद नामक चालकाशी संवाद साधला असता त्याने सांगितले की माझे साडेतीन लाखांचे टॅक्सीभाडे थकले आहे, नाशिकला देतो, असे सांगून त्याने मला सोबत आणले. यानंतर दोघांची फसवणूक अमितसिंग याने केल्याची त्यांच्या लक्षात आले.
नाशिक : आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून मुलुंडच्या एका भामट्याने चक्क नाशिकच्या तारांकित हॉटेलचालकांसह टॅक्सीसेवा पुरविणाºया खासगी कंपनीच्या चालकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ‘मुन्नाभाई आपीएस’च्या शहरातून मुसक्या आवळल्या आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुलुंड येथील रहिवासी व मूळचा उत्तर प्रदेशचा निवासी असलेला अमित अंबिका सिंग (२५) याने एका खासगी सेवा पुरविणा-या टॅक्सी कंपनीकडे आॅनलाइन बुकिंग करून चालक जगप्रसाद रामदिन मोरयाच्या (३७, रा.ग्रॅन्टरोड, मुंबई) ताब्यातील कार (एम.एच.०१ सीजे ४७४४) घेत मुंबईहून नाशिकच्या दिशेने १६ मार्च रोजी निघाला. यावेळी अमितसिंग याने कमरेला पिस्तूलही लावलेले होते, असे फिर्यादित जगप्रसाद यांनी म्हटले आहे. महामार्गावरील एका तारांकित हॉटेलमध्ये अमितसिंग याने संध्याकाळी तीन दिवसांसाठी रुम घेतली. तेथे वास्तव्य केल्यानंतर त्याने १८ मार्च रोजी जगप्रसाद यास शिर्डीला घेऊन जाण्यास सांगितले, तेथून एक कोटी रुपये एका साहेबाकडून घ्यावयाचे आहे, असा बहाणा केला. तत्पूर्वी शहरातील चांडक सर्कल येथील एका हॉटेलमध्ये दोन दिवस अमितसिंग याने रुम घेऊन मुक्काम ठोकला. त्यानंतर शिर्डीच्या दिशने टॅक्सीतून अमितसिंग मार्गस्थ झाला. मुंबई येथून त्याच्यासोबत वसीम सय्यद नावाचा इसमही आला होता; त्याने त्यास हा माझा चालक आहे, अशी ओळख जगप्रसाद यांना करून दिली होती. जगप्रसाद या दोघांना घेऊन शिर्डीला पोहचले. यावेळी त्यांनी गाडीभाडे मागितले, मात्र अमितसिंग याने नकार देत एक कोटी रुपयांचे दोन खोके डिक्कीत ठेवलेले आहे, त्यामधून पैसे काढणे शक्य नसल्याचे सांगत दहा हजार रुपये उसनवार घेतले.
अशी पटली फसवणुकीची खात्री
नाशिकला ‘मुन्नाभाई आयपीएस’ याने पुन्हा शरणपूररोड परिसरातील एक तारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य केले. दरम्यान, जगप्रसाद यांनी त्याच्यासोबत असलेल्या सय्यद नामक चालकाशी संवाद साधला असता त्याने सांगितले की माझे साडेतीन लाखांचे टॅक्सीभाडे थकले आहे, नाशिकला देतो, असे सांगून त्याने मला सोबत आणले. यानंतर दोघांची फसवणूक अमितसिंग याने केल्याची त्यांच्या लक्षात आले. जगप्रसाद यांनी कुठलाही विलंब न करता थेट सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून संशयित तोतया आयपीएस अधिकारी अमितसिंगविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपासचक्रे फिरवत नवीन मध्यवर्ती बसस्थानकातून ‘मुन्नाभाई आयपीएस’ यास बेड्या ठोकल्या.