मुंब्राच्या सराईत गुंडाला नाशकातील वडाळ्यात ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 06:09 PM2019-04-19T18:09:45+5:302019-04-19T18:10:11+5:30
पोलिसांनी गुरुवारी (दि.१८) रात्री ११ ते मध्यरात्रीपर्यंत वडाळागाव परिसरात मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक आबा पाटील यांच्या पथकाने परिसर पिंजून काढत गावात गुन्हेगारांचा शोध घेतला.
नाशिक : मुंब्रा पोलिसांना विविध गंभीर गुन्ह्यांत हवा असलेला सराईत गुन्हेगार इरफान शमशुद्दीन शेख (४२) यास वडाळागावातील सादिकनगर भागातून इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच येथील झिनतनगरमधून तडीपार बु-हान शाकीर शेख (२५) या गुन्हेगाराच्याही मुसक्या आवळण्यास पोलिसांना आॅल आउट आॅपरेशनदरम्यान यश आले. बु-हान याने पोलिसांच्या हातावर तुरी देण्याचा प्रयत्न करत घरात जाऊन लपण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे त्याचा प्रयत्न फसला.
शहर व परिसरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सर्व पोलीस ठाण्यांना आपापल्या हद्दीत सतर्क राहून वेळोवेळी मिशन आॅल आउट राबविण्याचे आदेश दिले आहे. यानुसार पोलिसांनी गुरुवारी (दि.१८) रात्री ११ ते मध्यरात्रीपर्यंत वडाळागाव परिसरात मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक आबा पाटील यांच्या पथकाने परिसर पिंजून काढत गावात गुन्हेगारांचा शोध घेतला. दरम्यान, येथील सादिकनगर भागातून पोलिसांना मुंब्रा येथील सराईत गुन्हेगार इरफान हाती लागला. तसेच झीनतनगर भागात पोलिसांनी मोर्चा वळविला असता तेथे एका रिक्षामध्ये तडीपार बु-हान बसलेला आढळला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने रिक्षातून पळ काढत घर गाठले. पोलिसांनी घरातून त्यास अटक करण्याचा प्रयत्न केला असता त्याने फिनाइल पिण्याचे ढोंग केले; मात्र पोलिसांनी त्यास बेड्या ठोकून थेट जिल्हा रुग्णालयात हलविले. त्या ठिकाणी त्यांनी औषध उपचार करण्यास नकार देत डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत मारण्याची धमकी देत धिंगाणा घालत रुग्णालयातून पळ काढला असता गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या रुग्णालयाच्या आवारात पुन्हा मुसक्या आवळल्या. यावेळी डॉक्टरांनी त्याची तपासणी करून ‘हा कुठल्याहीप्रकार अस्वस्थ नाही, याला उपचाराची गरज नाही’ असे स्पष्टीकरण दिले. या मोहिमेत उपायुक्त अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, उपनिरीक्षक रोहित शिंदे, अंकुश दांडगे, अजय मोरे, जगदीश गावित आदींनी सहभाग घेतला.