मुंडेंनी महाराष्ट्राला ‘ऊर्जा’ दिली, शरद पवार यांचे गौरवोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:03 AM2019-03-04T05:03:41+5:302019-03-04T05:03:56+5:30

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम करण्याचे अनेक प्रसंग आले. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना त्यांनी या पदाची प्रतिष्ठा वाढविली.

Mundane gave 'energy' to Maharashtra, Sharad Pawar's remarks | मुंडेंनी महाराष्ट्राला ‘ऊर्जा’ दिली, शरद पवार यांचे गौरवोद्गार

मुंडेंनी महाराष्ट्राला ‘ऊर्जा’ दिली, शरद पवार यांचे गौरवोद्गार

Next

नाशिक : स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम करण्याचे अनेक प्रसंग आले. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना त्यांनी या पदाची प्रतिष्ठा वाढविली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळातच ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित केले होते, त्याच धर्तीवर मुंडे यांनी ऊर्जा निर्मितीला महत्त्व देत भरीव काम केले, असे गौरवोद्गार राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी काढले.
महाराष्टÑाच्या राजकारणात एकेकाळी शरद पवार आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय ‘सख्य’ जगजाहीर होते. १९९५ साली मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तर मुंडे यांचे पुतणे धनंजय यांना पक्षात घेत पवारांनी मुंडे यांना कुटुंबातूनच आव्हान उभे केले.
या पार्श्वभमीवर रविवारी शरद पवार आणि मुंडे यांच्या कन्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे एका व्यासपीठावर होते. उभयतांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली. पवारांनी आपल्या ट्रस्टच्यावतीने ५० लाख रुपये दिले. त्यातून स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावे गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा सल्ला दिला. निमित्त होते, क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते.
वंजारी समाज सर्वत्र विखुरलेला असून, या समाजाची दादागिरी असल्याचे म्हटले जाते. चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर दादागिरी करावी लागते, असे पंकजा मुंडे यांनी ठणकावून सांगितले. शरद पवार यांच्या एकूणच कारकिर्दीकडे पाहिले तरी निम्मे राजकारण शिकायला मिळेल. त्यामुळेच साऱ्या देशाचे लक्ष त्यांच्याकडे असते, असे गौरवोद्गारही पंकजा यांनी काढले.
>...पवारांनी पुढे केला पंकजाकडे कोरा कागद
आ. जितेंद्र आव्हाड यांनी पंकजा यांच्या कार्याचा गौरव करताना, त्यांच्याकडे कधीही आर्थिक मदतीसाठी गेलो असता, पन्नास लाख, एक कोटी रुपये त्यांनी कोऱ्या कागदावर लिहून दिल्याचे सांगितले. या भाषणानंतर शरद पवार यांनी शेजारी बसलेल्या पंकजा मुंडे यांच्याकडे कोरा कागद पुढे करून अप्रत्यक्ष मदतीची अपेक्षा व्यक्त केली. यावर पंकजा व उपस्थितांनाही हसू आवरता आले नाही. पवारांच्या समयसूचकतेला सर्वांनी टाळ्यांनी प्रतिसाद दिला.
>दिलीपकुमार
आणि दीपिका!
स्व. विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात आपण शरद पवार यांना महानायक दिलीपकुमार यांची उपमा दिली होती. भाषण आटोपताच पवार यांनी आपल्याला सध्याची टॉप अभिनेत्री कोण? अशी मला विचारणा केल्यावर मी दीपिका पादुकोेनचे नाव सांगितले. हे विचारण्यामागचे कारण मला तेव्हा कळाले नाही, मात्र त्यांच्या भाषणात त्यांनी आपण त्याकाळचे दिलीपकुमार असू तर आत्ताची दीपिका पादुकोन पंकजा मुंडे आहे, असे सांगून आपली फिरकी घेतल्याची आठवण मुंडे यांनी सांगितली.

Web Title: Mundane gave 'energy' to Maharashtra, Sharad Pawar's remarks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.