महापालिकेसमोर मुंडण
By admin | Published: April 20, 2017 01:05 AM2017-04-20T01:05:17+5:302017-04-20T01:05:17+5:30
नाशिक : वसाहतींना घरपट्टी लागू करावी यांसह विविध मागण्यांसाठी गौतमनगरयेथील नागरिकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढला.
नाशिक : वसाहतींना घरपट्टी लागू करावी, पाणीपुरवठ्याची सुविधा पुरवावी यांसह विविध मागण्यांसाठी गौतमनगर, साठेनगर, रमाबाईनगर, शांतीनगर येथील नागरिकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढला. याचवेळी काही नागरिकांनी मुंडण करत महापालिकेचा निषेधही नोंदविला.
मनसेचे सरचिटणीस प्रशांत खरात यांच्या नेतृत्वाखाली बी. डी. भालेकर मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा अण्णा भाऊ साठे पुतळा, शालिमार मार्गे राजीव गांधी भवनवर नेण्यात आला.
संबंधित परिसरातील वसाहतींना घरपट्टी त्वरित लागू करावी, ज्यांचा जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान योजनेंतर्गत घरकुलाला विरोध आहे, त्यांना आहे त्या ठिकाणीच घरकुले देण्यात यावीत, वंचित लोकांचा सर्व्हे करून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट करून घ्यावे, गौतमनगर, साठेनगर या भागात बांधण्यात येणाऱ्या गट शौचालयांचे अपूर्ण काम पूर्ण करावे, वसाहतीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोग अंतर्गत सर्व्हे करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी आदि मागण्यांचे निवेदन यावेळी अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आले. तत्पूर्वी, राजीव गांधी भवनसमोर आंदोलकांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली, तसेच काही लोकांनी निषेध म्हणून मुंडणही केले.
मोर्चात सचिन मोरे, राहुल उजागरे, प्रवीण जाधव, दत्ता फाटे, दिलीप मोरे, सुनील धोत्रे, राजू डोंगरे, भीमराव पवार, रंजना कोलगे, अलका डाखोरे, मीना शेळके, बबिता काळे, जयवंता गांगुर्डे आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)