मुंढेगाव येथे बहुदिव्यांग मुलीने बजावला मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:04 PM2019-04-29T12:04:22+5:302019-04-29T12:04:33+5:30
घोटी : लोकशाही व्यवस्था बळकट होऊन सक्षम शासन निर्माण करण्यासाठी चिमुकले योगदान म्हणजे मतदान करणे आवश्यक असल्याचे सांगत बहुदिव्यांग मुलीने आपला हक्क बजावला.
घोटी : लोकशाही व्यवस्था बळकट होऊन सक्षम शासन निर्माण करण्यासाठी चिमुकले योगदान म्हणजे मतदान करणे आवश्यक असल्याचे सांगत बहुदिव्यांग मुलीने आपला हक्क बजावला. एकीकडे शरीराने सक्षम मतदारांकडून मतदान करण्यास उदासीनता वाढीला लागली असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. अशा स्थितीत बहुदिव्यांग मुलीच्या मतदानाच्या इच्छेला निवडणूक यंत्रणा धावून आली. सर्व स्वयंसेवक आणि यंत्रणेच्या रूग्णवाहिकेने बहुदिव्यांग मुलीला घरापासून मतदान केंद्र ते पुन्हा घर असे महत्वपूर्ण सहकार्य केले. मुंढेगाव ता. इगतपुरी येथील कु.कविता अर्जुन गतीर (२२) ही बहुदिव्यांग मतदार आहे. आपल्या देशाचे जागरूक नागरिक बनून लोकशाही व्यवस्था बळकट व्हावी म्हणून तिने मतदान करण्याचे निश्चित केले. याबाबत पंचायत समतिीचे रिसोर्स शिक्षक बाप्पा गतीर यांना तिची आत्मीयता समजली. त्यांनी मतदान केंद्रातील वाहन घेऊन विविध स्वयंसेवकांच्या मदतीने तिला मतदानाच्या हक्कासाठी मतदान केंद्रात आणले. तिने उत्स्फूर्तपणे मतदान करून सक्षम मतदारांना एक आदर्श उभा केला. मतदान केंद्रातुन तिला पुन्हा घरपोच करण्यात आले. यावेळी तिच्या एका कृतीने मतदानाची व्यवस्था भक्कम करण्यास मोठा हातभार लागला असे बाप्पा गतीर यांनी सांगितले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राहुल पाटील यांना या घटनेबाबत समजताच त्यांनी कु. कविता गतीर हिचे कौतुक केले आहे.