मुंढे यांच्याकडून ‘सुलभ’ची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:18 AM2018-08-30T00:18:13+5:302018-08-30T00:19:25+5:30
महापालिकेने सुलभ इंटरनॅशनलला देखभाल दुरुस्तीसाठी दिलेली तब्बल ३६ शौचालये जागेवरून गायब झाली असल्याचे आढळून आले आहे. ‘लोकमत’ने शौचालये चोरी प्रकरण प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेत दाखल झालेल्या ‘सुलभ’च्या अधिकाऱ्यांची आयुक्त तुकाराम मुंढे यांनी झाडाझडती घेतली.
नाशिक : महापालिकेने सुलभ इंटरनॅशनलला देखभाल दुरुस्तीसाठी दिलेली तब्बल ३६ शौचालये जागेवरून गायब झाली असल्याचे आढळून आले आहे. ‘लोकमत’ने शौचालये चोरी प्रकरण प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेत दाखल झालेल्या ‘सुलभ’च्या अधिकाऱ्यांची आयुक्त तुकाराम मुंढे यांनी झाडाझडती घेतली. सुलभच्या शौचालयांची स्वच्छता महापालिकेचे कर्मचारी करीत असल्याच्या मुद्द्यावर त्यांची कानउघडणी करतानाच करार रद्द करण्याचा इशारा दिला आहे. महापालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी सुलभ शौचालय सुलभ कंपनीला पीपीपी तत्त्वावर तीस वर्षांसाठी दिले असून, मिळालेल्या माहितीनुसार शहरात एकूण असलेल्या ४०० पैकी १५९ शौचालये सुलभ कंपनीला आत्तापर्यंत चालवण्यास दिले आहेत. मात्र, त्याची दुरवस्था झाली आहे. नागरिकांच्या याबाबत तक्रारी असून महापालिकेचे कर्मचारी साफसफाई करीत आहेत. पे अॅँड युजच्या माध्यमातून संबंधित कंपनीला उत्पन्न मिळते मात्र स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेला पार पाडावी लागते. याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. आयुक्तांनी केलेल्या तपासणीत १५९ पैकी ३६ शौचालये सुलभ कंपनी प्रत्यक्षात दाखवूच शकली नव्हती. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेने सुलभ कंपनीला नोटीस पाठविली असून मंगळवारी (दि.२८) कंपनीचे अधिकारी तातडीने दाखल झाले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांना खडसावून जाब विचारला असून, पाच दिवसांत सर्व शौचालये स्वच्छ करून देण्याचे आदेश देतानाच यापुढे महापालिकेचे कर्मचारी ते स्वच्छ करणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.
आयुक्तांच्या सूचना
महापालिकेने सुलभ कंपनीला दिलेली सर्व शौचालये जीओ टॅगने जोडण्यात यावीत तसेच अॅपला त्याची लिंक द्यावी आणि ई कनेक्टला ते जोडून नागरिकांची तक्रार आल्यास त्वरित त्याची दखल घ्यावी, अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.