मुंढे यांना नाट्य कलावंतांकडून ‘अल्टिमेटम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:52 AM2018-09-26T00:52:35+5:302018-09-26T00:53:45+5:30
शहरातील महाकवी कालिदास कलामंदिराच्या वास्तूचे नूतनीकरण व अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध क रून देण्यात आल्या आहेत; मात्र याचा उपभोग घेण्यासाठी कलावंतांसह नाशिककरांना अव्वाच्या सवा भाडेवाड परवडणारी नाही;
नाशिक : शहरातील महाकवी कालिदास कलामंदिराच्या वास्तूचे नूतनीकरण व अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध क रून देण्यात आल्या आहेत; मात्र याचा उपभोग घेण्यासाठी कलावंतांसहनाशिककरांना अव्वाच्या सवा भाडेवाड परवडणारी नाही; त्यामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन जुने दर व नियमावली कायम ठेवावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेने केली आहे. मुंढे यांना याबाबत निवेदन देण्यात येणार असून, तीन दिवसांमध्ये निर्णय प्रशासनाकडून घेतला गेला नाही, तर तीव्र आंदोलन उभारण्याच्या पावित्र्यात कलावंत आहे. मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या कार्यालयात मंगळवारी (दि.२५) संध्याकाळी अध्यक्ष रवींद्र कदम, उपाध्यक्ष शाहू खैरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. या मागणीचे निवेदन महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती व सर्वपक्षीय गटनेत्यांना कलावंत देणार आहे.
या निवेदनानंतर तीन दिवसांमध्ये भाडेवाढ व नियमावलीसंदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याबाबतची भूमिका बैठकीत घेतली गेली. नव्याने करण्यात आलेली भाडेवाढ पूर्णत: रद्द करण्यात यावी आणि शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीला हातभार लावावा, असे कलावंतांनी पत्रात म्हटले आहे. याप्रसंगी प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, रवींद्र ढवळे, सुनील परमार यांसह आदी कलावंत उपस्थित होते. बैठकीत कालिदासच्या भाडेवाढीचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. तसेच कालिदासची नियमावलीदेखील अत्यंत जाचक स्वरूपाची असून, जुने दर व नियम कायम करून नाशिककर रसिकांना व कलावंतांना प्रशासनाने दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.