मुंढे यांच्या स्वागताची तयारी : कृषिनगर परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले समाधान जॉगिंग ट्रॅकला लाभला झाडू स्पर्श!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:35 AM2018-05-04T00:35:59+5:302018-05-04T00:35:59+5:30
नाशिक : एरव्ही पालापाचोळा, कचरा इतकेच नव्हे तर वारंवार फुटलेल्या जलवाहिनीचे साचलेले पाणी आणि लगतच वाहणारी दुर्गंधयुक्त गटार कृषिनगर जॉगिंग ट्रॅकवर हे सर्व चित्र गुरुवारी अचानक बदलून गेले.
नाशिक : एरव्ही पालापाचोळा, कचरा इतकेच नव्हे तर वारंवार फुटलेल्या जलवाहिनीचे साचलेले पाणी आणि लगतच वाहणारी दुर्गंधयुक्त गटार कृषिनगर जॉगिंग ट्रॅकवर हे सर्व चित्र गुरुवारी अचानक बदलून गेले. आयुक्त तुकाराम मुंढे हे येत्या शनिवारी (दि.५) वॉक विथ कमिशनर हा कार्यक्रम राबविणार असून, त्यासाठी ही सज्जता बघून ट्रॅकवर नियमित येणाऱ्या नागरिकांना सुखद धक्का बसला. आयुक्त येणार म्हणून जर अशी साफसफाई होणार असेल तर आयुक्तांनी येथे नियमित वॉक करावा, अशी भावनादेखील त्यांनी व्यक्त केली. कृषिनगर जॉगिंग ट्रॅकवर दररोज सकाळ आणि सायंकाळ शेकडो नागरिक वॉकसाठी जात असतात. परंतु तेथील समस्यांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. ट्रॅकवरील कचरा उचलला जात नाही त्याचबरोबर अनेकदा या ट्रॅकमधून जाणारी जलवाहिनी फुटल्याने पाणी साचलेले असते. तेथे दुरुस्तीचे कामही अनेक दिवस रेंगाळलेले असते. परंतु त्याकडे लक्ष पुरवले जात नाही. ट्रॅकच्या लगतच झोपडपट्टी असून त्यामुळे ट्रॅकच्या बाहेरील काही भाग हा हगणदारीयुक्त असतो. महाराष्टÑ पोलीस अकादमीचे सांडपाणी सिद्धार्थनगर झोपडपट्टी मार्गे या ट्रॅकच्या लगतच वाहत असते. कित्येकदा नदीकिनारी ट्रॅक असावा तसे गटारीच्या शेजारी हा ट्रॅक साकारला की काय अशी शंका उपस्थित होते. अनेकदा तक्रारी करूनही हे सांडपाणी थांबवले जात नाही आणि गुरुवारी (दि. ३) सकाळी अचानक कर्मचारी ट्रॅकवर आले आणि साफसफाई करू लागले. इतकेच नव्हे तर कचरा भरण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीदेखील ट्रॅकवर आणण्यात आली. अनेक महिन्यांनी ट्रॅकला झाडू स्पर्श झाला आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.