मुंढे यांच्यावरून भाजपात खडाजंगी ; पक्षबैठकीत संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 01:33 AM2018-09-18T01:33:20+5:302018-09-18T01:33:40+5:30

महापालिकेत सत्ता असूनही आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात काहीही करता येत नसल्याने नाराज असलेल्या नगरसेवकांनी सोमवारी (दि.१७) पक्षबैठकीतही संताप व्यक्त केला.

 Mundhe's stance on BJP; Party satire | मुंढे यांच्यावरून भाजपात खडाजंगी ; पक्षबैठकीत संताप

मुंढे यांच्यावरून भाजपात खडाजंगी ; पक्षबैठकीत संताप

googlenewsNext

नाशिक : महापालिकेत सत्ता असूनही आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात काहीही करता येत नसल्याने नाराज असलेल्या नगरसेवकांनी सोमवारी (दि.१७) पक्षबैठकीतही संताप व्यक्त केला. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आणि महापौरांसह साऱ्यांनीच आयुक्तांच्या कार्यपध्दतीला लक्ष केले असताना त्यांचे समर्थन करणा-या आमदार देवयानी फरांदे तसेच पक्षाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांना मात्र रोषास सामोरे जावे लागले. फरांदे या आयुक्तांच्या भेटीसाठी वारंवार जातात आणि सुपारी घेतात अशाप्रकारचे गंभीर आरोप सभागृह नेते दिनकर पाटील यांनी केले. यावेळी फरांदे यांनी पक्षशिस्तीची भाषा केली.  असता कॉँग्रेससह अन्य पक्षांतून आलेल्या सर्वांनाच आता बाहेर काढा, असा टोला त्यांना लगावण्यात आला.  महापौरांचे निवासस्थान असलेल्या ‘रामायण’ याठिकाणी भाजपातील हे ‘महाभारत’ घडले. येत्या बुधवारी (दि.१९) महासभा असून त्यात शहर बस वाहतूक तसेच मखमलाबाद शिवारात नगररचना योजना साकारण्याचे दोन महत्त्वपूर्ण प्रस्ताव असून त्यासह अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र, मूळ विषयांपेक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपध्दतीवरच जोरदार चर्चा झाली. मुंढे यांच्यासंदर्भात आमदारत्रयी आपले राजकारण करतात आणि बळी देण्याची वेळ आली की महापालिकेतील पदाधिकाºयांना पुढे करतात, असा आरोपही करण्यात आला. या बैठकीस उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, गटनेता संभाजी मोरूस्कर, माजी शहराध्यक्ष विजय साने यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते.  बैठकीच्या प्रारंभीच आमदार देवयानी फरांदे यांनी यंदाच्या महासभेत बससेवा आणि नगररचना योजनेचे स्मार्ट सिटीचे चांगले प्रस्ताव मांडण्यात आल्याचे सांगितले तेव्हा शहराध्यक्ष सानप संतप्त झाले. नागरिकांची कामे होत नाहीत, आमदारांच्या कामांवर फुल्या मारण्यात आल्या, शेतकºयांवर कर लादून स्मार्ट सिटी करून काय करायचे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सुनील बागुल व दिनकर पाटील यांनीदेखील आज प्रभागातील सुचवलेली कामे केली जात नाहीत. तसेच सर्व कामांचे श्रेय प्रशासनच लाटत आहेत. नगरसेवकांना प्रभागात फिरणे मुश्कील झाल्याचे सांगितले.  लक्ष्मण सावजी यांनी आपण मूळ विषयावर चर्चा करण्याची गरज असून अन्य विषयांतर नको असल्याचे सांगितले. मात्र बससेवा करताना पुन्हा आयुक्तांना सर्वाधिकार देण्यास नगरसेवकांनी विरोध केला. खुद्द आमदार सानप यांनीदेखील परिवहन समिती नसेल तर काय उपयोग असा प्रश्न केला. प्रशासनाचे प्रस्ताव महासभेत परस्पर सादर होतात, परंतु पदाधिकारी यात लक्ष घालत नाही असे सांगून आमदार आणि पक्ष पदाधिकाºयांनी महापौर रंजना भानसी आणि अन्य पदाधिकाºयांवर बाजू उलटविण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब सानप यांनी तर आपण महापौर असताना प्रशासनाने पाठविलेले कोणते प्रस्ताव महासभेत घ्यायचे आणि कोणते बाजूला ठेवायचे हे ठरवून मगच महासभेच्या तारखा जाहीर करत असू असे सांगितले तर सावजी यांनी आयुक्तांवर आणि प्रशासनावर कोणाचा वचक नाही काय, असा प्रश्न करण्यात आला. त्यानंतर मात्र नगरसेवकांनी रोष व्यक्त केला.
महापौर रंजना भानसी यांनी आपल्याला प्रस्तावांविषयी प्रशासनाकडून कल्पना दिली जात नसल्याची तक्रार केली तर नगरसेवकांनी आयुक्त मुंढे हे कोणाला विश्वासात घेत नसल्याचा पुनरुच्चार करण्यात आला. आयुक्त मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच महासभेत यापुढे आपल्याला योग्य वाटतील तीच कामे करू, असा सल्ला दिल्याचे सांगितले तर दिनकर पाटील यांनी नगरसेवकांच्या तक्रारी मांडताना आमदारांना धारेवर धरले. शहराध्यक्ष बाळासाहेब सानप या सर्व विषयांवर का बोलत नाही असा प्रश्न त्यांनी केला. सावजी यांना तर पाटील यांनी तुम्ही निवडून या मग बोला असेही सुनावले. आमदार फरांदे यांच्याशी तर त्यांची खडांजगी झाली. आयुक्त मुंढे आपली कामे करीत असल्याचे त्यांनी सांगताच तुम्ही त्यांच्याकडे वारंवार जातात असा आरोप पाटील यांनी केला. दरम्यान, परिवहन सेवा आणि नगररचना योजना तसेच करवाढ या विषयांवर आयुक्तांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे ठरले. त्यानंतर बैठक उरकण्यात आली.
फरांदे-पाटील यांच्यात तू तू-मैं मैं
आमदार फरांदे यांनी पाटील यांना पक्षशिस्तीची जाणीव करून दिली त्यावेळी पाटील यांनी उसळून आम्ही बाहेरच्या पक्षाचे आहे. तर मग कशाला आम्हाला पक्षात ठेवतात, पक्षातून काढून टाका, असे सांगितले. मी शेतकºयांच्या बाजूने आहे करवाढीच्या वेळीसुध्दा तुम्ही समर्थन केले. शेवटी निवडणुका तुम्हालाही लढायच्या आहेत, प्रचार आम्ही करणार आहोत हे लक्षात ठेवा. आयुक्तांवरील अविश्वास ठराव मागे घेताना त्यावर आपण सही न दिल्याने आपल्यावर रोष असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार फरांदे यांनी आपण पक्षशिस्त आणि पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसारच करवाढीसंदर्भात भूमिका मांडल्याचे सांगितले. आपण फक्त शहराध्यक्ष सानप यांचेच ऐकू असे त्यांनी सांगितल्यानंतर तुम्ही सानपांविषयी काय बोलत असतात याची जाणीव करून दिल्यानंतर पाटील यांनी मी सानपांच्या विरोधात बोलतो हे त्यांच्या समोर सांगतो असे सुनावले. अखेरीस कसा तरी वाद थांबला.
आमचे सारेच पैसे पाण्यात
आयुक्त आमची कोणतीही कामे करीत नाहीत. मोठ्या परिश्रमाने विशेष निधी मंजूर करून आणला मात्र तीस कोटी रुपयांचा निधी आयुक्तांनी पाण्यात घातला. आमदारांच्या कामांच्या एनओसीदेखील आयुक्तांनी नाकारल्या अशाप्रकारच्या तक्रारी आमदार सानप यांनी मांडल्या.
महापौरांची हतबलता
महासभेत प्रस्ताव येतात, परंतु आपल्याला पुरेशी माहिती नसते. महासभेची तारीख नगरसचिव घेतात, हेच मी अनेक वेळा सांगितल्याचे महापौर रंजना भानसी यांनी सांगितले. आमदार फरांदे यांनी महासभेसाठी आयुक्तांकडून प्रस्ताव आले की त्यावर आधी पार्टी मिटिंग घ्यावी आणि कोणते विषय महासभेत घ्यायचे, हे ठरवून घ्यावे अशी सूचना केली.

Web Title:  Mundhe's stance on BJP; Party satire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.