कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेचे नेमले नोडल ऑफिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:15 AM2021-03-27T04:15:32+5:302021-03-27T04:15:32+5:30
नाशिक - शहरात कोरोनाचे संकट वाढत असून, ते टाळण्यासाठी आवश्यक त्या निर्बंधांचे पालन होत नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त कैलास ...
नाशिक - शहरात कोरोनाचे संकट वाढत असून, ते टाळण्यासाठी आवश्यक त्या निर्बंधांचे पालन होत नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आता सहा विभागांसाठी सहा नोडल ऑफिसर नियुक्त केले असून, उपायुक्त तथा तत्सम दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे जबाबदारी साेपवली आहे. आयुक्त कैलास जाधव यांनी सहा विभागांमध्ये कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक त्या कृतीची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविली होती. आता त्यापुढे जाऊन ही सहा विभागांसाठी नोडल अधिकारीच नियुक्त केले आहेत. यात उद्यान विभागाचे उपआयुक्त शिवाजी आमले यांच्यावर सिडको विभाग, मुख्य लेखापरीक्षक बोधीकिरण सोनकांबळे यांच्याकडे नाशिक रोड विभाग, उपायुक्त अर्चना तांबे यांच्याकडे नाशिक पश्चिम, उपायुक्त (कर) प्रदीप चौधरी यांच्याकडे नाशिक पूर्व विभाग, उपायुक्त (अतिक्रमण) करुणा डहाळे यांच्याकडे सातपूर विभाग, तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन यांच्याकडे पंचवटी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या नोडल अधिकाऱ्यांनी रोज सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत आपल्याकडे सोपविलेल्या विभागीय कार्यालयात जाऊन त्या विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी तसेच कोरेाना स्थितीचा आढावा घ्यावा, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांची अद्ययावत यादी करावी तसेच हेल्थ सेंटरमध्ये दाखल रुग्णांबाबत देखील कार्यवाही करावी, केाविड केअर सेंटरमध्ये दाखल रुग्णांपैकी लक्षणे नसणाऱ्या आणि अन्य रुग्णांची अद्ययावत माहिती ठेवावी तसेच गृहविलगीकरणातील बाधित रुग्णांची माहितीदेखील घ्यावी, आरोग्य नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच दररोज दुपारी बारा वाजेपर्यंत आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
इन्फो...
तर नोडल ऑफिसर्सवरच कारवाई
महापालिका आयुक्तांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत अधिकाऱ्यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली असून अधिकाऱ्यांनी जबाबदारीचे वहन न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही नियुक्ती आदेशातच देण्यात आला आहे.