पालिकेतील सत्ताधारी, प्रशासनामध्ये जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 12:28 AM2020-07-06T00:28:30+5:302020-07-06T00:28:53+5:30
महानगरातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असताना, पालिकेतील सत्ताधारी गटच त्या प्रयत्नांच्या पूर्ततेत बाधा निर्माण करीत असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे. कोरोना नियंत्रणासाठी महापौर सतीश कुलकर्णी हे विशिष्ट काढ्याची शिफारस करीत कोरोना चाचणीचे साहित्य खरेदीत अडथळा निर्माण करीत असल्याचे बोलले जात आहे.
नाशिक : महानगरातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असताना, पालिकेतील सत्ताधारी गटच त्या प्रयत्नांच्या पूर्ततेत बाधा निर्माण करीत असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे. कोरोना नियंत्रणासाठी महापौर सतीश कुलकर्णी हे विशिष्ट काढ्याची शिफारस करीत कोरोना चाचणीचे साहित्य खरेदीत अडथळा निर्माण करीत असल्याचे बोलले जात आहे. संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी प्रभागनिहाय तपासणीचे दोन ठराव सत्ताधारी भाजपने दोन आठवड्यांपासून दडवून ठेवले असून, त्यामुळे लॅबसाठीचे अत्यावश्यक साहित्य खरेदीसह शहरातील नागरिकांच्या सर्वेक्षणाच्या कामावरही परिणाम झाला आहे.
नाशिक शहरात कोरोनाचे थैमान सुरू झाले आहे. जून महिन्यात कोरोनाचे सुमारे दोन हजार रु ग्ण वाढल्याने नाशिक शहर आता तीन हजारांकडे झेपावले आहे. शहरातील करोना नियंत्रणासाठी महापालिका यंत्रणा ही अपुऱ्या मनुष्यबळावर लढत आहे. वैद्यकीय विभागातील रिक्त पदे आयुक्त राधाकृष्ण गमेंनी मानधनावर भरली असून, अन्य कर्मचारी वर्गही त्यांच्या दिमतीला देण्यात आला आहे. तरीही शहरातील कोरोना स्थिती नियंत्रणात येत नसल्याने प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढवण्यासह आउटसोर्सिंगद्वारे शहरातील जनजागृतीचे तसेच घरोघर जाऊन आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील लष्कराच्या लॅबमध्ये सध्या कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. परंतु, या लॅबमध्ये टेस्टसाठी लागणारे साहित्य संपल्याने त्यांनी ते खरेदीसाठी प्रशासनाला विनंती केली आहे. त्यामुळे या लॅबसाठी अत्यावश्यक तांत्रिक साहित्य खरेदीचा दोन कोटींचा प्रस्तावासह वैद्यकीय विभागाच्या वतीने मे महिन्यातील महासभेवर एकूण साडेतीन कोटी रु पये खरेदीचे दोन प्रस्ताव ठेवले होते. त्यात गेल्या १८ जूनला झालेल्या महासभेत या दोन प्रस्तावांना मंजुरीही देण्यात आली. परंतु,पंधरा दिवस उलटले तरी, महापौर, गटनेता, सभागृहनेत्यांकडून सदरचे ठराव नगरसचिव विभागाला अंमलबजावणीसाठी देण्यात आलेले नाही.
भाजपकडून बाधा येत असल्याची चर्चा
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी तपासणी, जनजागृती आणि औषधे तसेच साहित्याची खरेदी अत्यावश्यक असल्याने वैद्यकीय विभागाकडून दररोज या ठरावांचा पाठपुरावा केला जात आहे. परंतु, ठरावाबाबत भाजपचे पदाधिकारी दाद देत नसल्याची चर्चा आहे.
कोरोना चाचण्यांसाठी अत्यावश्यक साहित्य खरेदीचा गंभीर विषय असतानाही, पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी चालढकल करीत दोन्ही ठराव पंधरा दिवसांपासून रोखून धरल्याचे बोलले जात आहे, तर महापौर कुलकर्णी हे एका वैद्यकीय काढाबाबत आग्रही भूमिकेत आहेत.