डासमुक्त शहरासाठी मनपाची जागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 01:05 AM2018-05-23T01:05:23+5:302018-05-23T01:05:23+5:30
शहरात डेंग्यूचे रुग्ण आता विविध रुग्णालयांमध्ये आढळून येत असून, डासमुक्त शहरासाठी महापालिकेने घरोघरी जाऊन जागृती मोहीम राबविण्यास सुुरुवात केली आहे. दरम्यान, शहरात मे महिन्यात आतापर्यंत ३९ संशयितांमध्ये १२ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.
नाशिक : शहरात डेंग्यूचे रुग्ण आता विविध रुग्णालयांमध्ये आढळून येत असून, डासमुक्त शहरासाठी महापालिकेने घरोघरी जाऊन जागृती मोहीम राबविण्यास सुुरुवात केली आहे. दरम्यान, शहरात मे महिन्यात आतापर्यंत ३९ संशयितांमध्ये १२ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी शहरात डेंग्यूने थैमान घातले होते. हजाराहून अधिक रुग्णांना डेंग्यूची बाधा झाली होती. मात्र, मागील वर्षी डेंग्यूचा प्रभाव काहीसा ओसरला होता. आता गेल्या पाच महिन्यांपासून शहरात डेंग्यूचे रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने डेंग्यू रोखण्यासाठी आणि डासमुक्त शहरासाठी जागृती मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यात आढळून येत असल्याने आणि प्रामुख्याने घरांमधील फ्रीज, मनी प्लांट, वॉटरकूलर यामध्ये त्यांची उत्पत्ती होत असल्याने सदर ठिकाणी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करत लोकांमध्ये जागृती करीत आहेत. महापालिकेतील मलेरिया विभागातील २६८, आशा कर्मचारी १५३ आणि ३० बहुद्देशीय सेवक यांच्याकडे हे जागृतीचे काम सोपविण्यात आले आहे. नागरी सहभागाशिवाय डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखणे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेने घरोघरी जाऊन तपासणीवर भर दिला आहे. दरम्यान, डेंग्यूचे डास आढळून आल्यास सदर पाण्याचा साठा ड्रेनेज लाइन अथवा टॉयलेटमध्ये न टाकता तो रस्त्यावर अथवा मातीत नष्ट करावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी केले आहे.