महापालिकेचे अंदाजपत्रक लांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:38 AM2018-02-24T00:38:17+5:302018-02-24T00:38:17+5:30
महापालिका आयुक्तांकडून दरवर्षी फेबु्रवारीच्या २० तारखेच्या आत आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणे आवश्यक असते. परंतु, २० तारीख उलटून गेल्यानंतरही अद्याप अंदाजपत्रक सादर झालेले नाही.
नाशिक : महापालिका आयुक्तांकडून दरवर्षी फेबु्रवारीच्या २० तारखेच्या आत आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणे आवश्यक असते. परंतु, २० तारीख उलटून गेल्यानंतरही अद्याप अंदाजपत्रक सादर झालेले नाही. माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी अंतिम केलेले अंदाजपत्रक नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुधारित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थायी समितीवर नव्याने आरूढ होणाºया सभापतीलाच मार्चमध्ये अंदाजपत्रक सादर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करत माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी ते छपाईसाठी पाठविले होते. सदर अंदाजपत्रक हे १४७५ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता कृष्ण यांनीच बोलून दाखविली होती. स्थायी समितीने यंदा अंदाजपत्रक हे जानेवारी महिन्यातच सादर करण्यासाठी प्रशासनाकडे लकडा लावला होता. परंतु, फेब्रुवारीच्या दुसºया आठवड्यात अंदाजपत्रक सादर केले जाईल, असे लेखा विभागामार्फत सांगितले जात होते. दरम्यान, अभिषेक कृष्ण यांची बदली झाली आणि तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. मुंढे यांनी अंदाजपत्रकाबाबत पुन्हा एकदा सर्व खातेप्रमुखांच्या बैठकावर बैठका घेत अजेंडा समजून सांगितला. आपल्या त्रिसूत्रीनुसार अंदाजपत्रकात तरतुदी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे, लेखा विभागामार्फत पुन्हा आकडेमोड केली जात आहे. येत्या २८ फेबु्रवारीला स्थायीवरील निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या रिक्त जागांवर नवीन सदस्यांची नियुक्ती विशेष महासभेत होणार आहे. त्यानंतर, ५ ते ७ मार्च या कालावधीत नवीन सभापतिपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, आयुक्तांकडून नवीन सभापतींकडेच अंदाजपत्रक सादर केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू असून, अद्याप तारीख ठरली नसल्याचे स्पष्ट केले आहे.