मनपा आयुक्तांचा पाहणी दौरा
By admin | Published: July 1, 2017 12:01 AM2017-07-01T00:01:35+5:302017-07-01T00:35:28+5:30
सिडको : येथील पेलिकन पार्क, बडदेनगर रस्ता, बाळासाहेब ठाकरे उद्यान, गणेश चौक उद्यानासह प्रलंबित असलेल्या नागरी विकासकामांची पाहणी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : येथील पेलिकन पार्क, बडदेनगर रस्ता, बाळासाहेब ठाकरे उद्यान, गणेश चौक उद्यानासह प्रलंबित असलेल्या नागरी विकासकामांची पाहणी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी केली. दरम्यान, मोरवाडी येथील मनपा रुग्णालयात आयुक्तांनी अचानक पाहणी केली असता त्याठिकाणी एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. सिडको भागातील प्रश्न हे महासभा तसेच प्रभागसभेत उपस्थित केल्यानंतरही मार्गी लागत नसल्याने नगरसेवकांनी प्रलंबित विकासकामांची पाहणी करण्याची विनंती आयुक्तांना केली होती. त्यानुसार आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेत सिडको भागातील प्रभाग २४, २५ व २९ मध्ये पाहणी दौरा केला. सुरुवातीला प्रभाग २९ मधील उघड्या नाल्यांत साचणारी घाण, बंद अवस्थेत असलेल्या पेलिकन पार्कचा प्रश्न मार्गी लावावा, तसेच उत्तमनगर ते पवननगर भागातील रस्ता कॉँक्रिटीकरण करण्याबाबत नगरसेवक मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, रत्नमाला राणे, छाया देवांग यांनी आयुक्तांकडे मागणी केली. यावेळी आयुक्तांनी पेलिकन पार्कबाबत न्यायालयीन बाब तपासून पार्कचे नव्याने डिझाइन तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यानंतर प्रभाग २५ चे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पवननगर भागातील पोलीस चौकीसमोरील रस्त्यावर पावसाचे पाणी साचून ते पाणी येथील दुकानदार व नागरिकांच्या घरात जात असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत येथील पाणी जाण्यासाठी स्वतंत्र आरसीसी गटार बांधून व्यवस्था करण्याचे सांगितले. यावर आयुक्तांनी संबंधित काम मार्गी लावावे, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
प्रभाग २४ चे नगरसेवक कल्पना पांडे, कल्पना चुंभळे, राजेंद्र महाले, प्रवीण तिदमे यांनी गणेश चौक उद्यानाची झालेली दुरवस्था, बाळासाहेब ठाकरे उद्यानात सुरक्षारक्षक नसल्याने उद्यानातील पथदीपांसह जॉगिंग ट्रॅक, लॉन्सच्या झालेल्या दुरवस्थेबाबत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. उद्यानात तातडीने सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याची गरज असल्याचेही नगरसेवकांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. बडदेनगर येथील सपना टॉकीजजवळील रस्त्याचे रखडलेले काम त्वरित मार्गी लावावे तसेच याच मार्गावरील एका इमारतीच्या बाजूला असलेल्या मनपाच्या मोकळ्या भूखंडाला संरक्षक जाळी लावण्याबाबतही सांगण्यात आले.