मनपा आयुक्तांची रात्रपाळी; भुयारीमार्ग, पथदीपांची पाहणी
By admin | Published: August 20, 2016 01:19 AM2016-08-20T01:19:23+5:302016-08-20T01:25:36+5:30
उपाययोजनांवर भर : भुयारीमार्गासंबंधी लवकरच बैठक
नाशिक : महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी रात्रीच्या वेळी कुणाही अधिकाऱ्याला सोबत न घेता शहरातील विविध भागांची पाहणी करण्याचा धडाका लावला असून, आयुक्तांच्या या रात्रपाळीमुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. दरम्यान, आयुक्तांनी द्वारकावरील भुयारीमार्गाची पाहणी करत तो कार्यान्वित करण्यासाठी पुढील आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पाटबंधारे विभाग यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित केले आहे.
आयुक्त कृष्ण यांनी रात्रीच्या सुमारास शहरातील विविध भागांची पाहणी सुरू केली आहे. बुधवारी रात्री आयुक्तांनी द्वारकावरील भुयारी मार्गाची पाहणी केली. सदर भुयारी मार्गात साचलेले पाणी, प्रवेशद्वारासमोर लागलेली वाहने आदि दृश्य आयुक्तांच्या नजरेस पडले. सदर भुयारीमार्गाची देखभाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे असून, तेथील देखभालीसंबंधीचा ठेका संपुष्टात आल्याने साफसफाई होत नाही.